कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवरुन आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि महाडिक गट यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे आता आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट बिंदू चौकात आमनेसामने येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष आता बिंदू चौकाकडे लागलं आहे. माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलंय. तेच आव्हान सतेज पाटील यांच्या गटाने स्वीकारलं आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात महाडिक आणि सतेज पाटील गट आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार ऋतुराज पाटील वाजत गाजत संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात येणार आहेत. खरंतर राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून महाडिक आणि पाटील गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. असं असताना आता दोन्ही गट आमनेसामने येऊन चर्चा करणार आहेत.
या सगळ्या घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्यामध्ये चांगलंच शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. काल एका सभेमध्ये सतेज पाटील यांनी व्यासपीठावरून भ्याले…भ्याले… महाडिक भ्याले असं म्हणत त्यांना खुले आव्हान दिलं होतं.
सतेज पाटील यांनी दिलेल्या या आव्हानाचा स्विकार करत श्री राजाराम साखर कारखान्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन मी आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्ही देखील डी वाय पाटील साखर कारखान्याची कागदपत्र घेऊन बिंदू चौकात यावं, असं प्रति आव्हान माजी आमदार अमल महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना दिलं आहे. आता अमल महाडिक यांच्या आव्हानाला सतेज पाटील काय उत्तर देतात याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे.
महाडिक गट आणि पाटील गट यांच्यातील वाद हा नवा विषय नाही. कोल्हापुरात नेहमी वेगवेगळ्या कारणास्तव दोन्ही गटांमधील संघर्ष उफाळून बाहेर येत असतो. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात असतात. आता दोन्ही गट बिंदू चौकात एकत्र येत असल्याने परिसरात तणाव निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे बिंदू चौकात पोलिसांकडून सुरक्षेची काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीसही अलर्ट असतील. त्यामुळे महाडिक आणि पाटील गटात उघडपणे आणि आमनेसामने कितपत चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.