कोल्हापूर : अहमदनगरमध्ये नुकतंच दोन गटात वाद झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरात पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड मोठी गर्दी जमली आहे. औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांचे अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी जमलेल्या नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे जमलेली गर्दी पाहून पोलीस प्रशासनदेखील सतर्क झालं आहे.
राज्यभरात आज शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या दरम्यान कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्ट स्टेटसवर ठेवले. त्यामुळे वाद निर्माण झालाय. संबंधित तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यासमोर गर्दी केलीय.
विशेष म्हणजे अवघ्या काही वेळात हिंदुत्ववादी संघटना या पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशाप्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.
तरुणांचा एवढा मोठा जमाव जमलेला पाहून पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आक्रमक कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं जात आहे.
दरम्यान, गर्दीतील एका कार्यकर्त्याने ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्याने कोल्हापूर बंदचा देखील इशारा दिला. “कोल्हापुरात जवळपास सहा ते सात अशी प्रकरणी झाली आहेत. आम्ही आज सकाळपासून ज्या ठिकाणी घडलंय तिथे तक्रार केली आहे. शाहपुरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोल्हापुरातील शिवभक्त पेटून उठले आहेत. कोल्हापूर उद्या बंद ठेवायचं अशी हाक द्यायचा विचार चालू आहे. पोलीस प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही तर पुढचा निर्णय घेतला जाईल”, असं संबंधित कार्यकर्ता म्हणाला.