कोल्हापूर : राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी संप पुकारला. याचा फटका राज्यातील जनतेवर बसत आहे. जे कर्मचारी संपावर गेलेत. त्यांना ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. तरीही त्यांची जुन्या पेन्शनची मागणी आहे. दुसरीकडे राज्यात १० ते २० हजार रुपये पगारावर खासगी काम करणारे तरुण आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नाहीत. उद्यापासून काम बंद करा म्हटलं तर केव्हाही नोकरीवर गदा येते. असे कमी पगारात काम करणारे युवक तसेच बेरोजगार आता या जुन्या पेन्शनच्या विरोधात एकत्र आले आहेत. जुनी पेन्शन योजना थांबवा महाराष्ट्र वाचवा, असे पोस्टर या युवकांनी सोशल मीडियावर टाकलेत. आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहोत. असं या बेरोजगार युवकांचं म्हणणं आहे.
जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपण मोर्च्यात सहभागी व्हा, असं आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता जुन्या पेन्शन विरोधात कोल्हापुरात बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा काढला.
आयोजकांची माहिती नसल्याने मोर्चा फसला. मात्र सोशल मीडियातील पोस्ट बघून काही बेरोजगार युवक दसरा चौकात जमले होते. दोन दिवसांत रीतसर परवानगी काढून पुन्हा मोर्चा काढणार असल्याचा निर्धार बेरोजगार युवकांनी केला.
राज्यात एकीकडं बेरोजगारांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला दाम मिळत नाही. नोकरदार हजारो रुपये कमवतात. त्यातल्या त्यात काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात. काही कर्मचारी कमिशनवर काम करतात. हे सारं सुरू असताना त्यांना जुनी पेन्शन योजना कशासाठी असा सवाल बेरोजगार युवकांनी केला आहे.
आज कोल्हापुरात बेरोजगार एकत्र आले. यानंतर पुन्हा इतर शहरातील बेरोजगार जुन्या पेन्शनविरोधात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
90 टक्के आमदार, खासदार हे करोडपती आहेत. त्यांना खरचं पेन्शनची गरज आहे का, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विचारला. जुनी पेन्शन योजना लागू करू नका. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढा आणि लोकप्रतिनिधींना मिळणारी पेन्शन बंद करा. सर्वांचीच पेन्शन बंद करा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. बेरोजगारांना काम मिळत नाही. आणि सरकारी नोकरदारांना हजारो रुपये पगार मिळतो. तरी त्यांना पेन्शनची गरज काय, असा सवाल सामान्य लोकांकडून विचारला जात आहे.