लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोयाबीनची मागणी आणि सोयाबीन तेलाचे वाढलेले भाव या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या दरांचा उच्चांक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यानिमित्तानं मराठवाडा आणि विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची यापूर्वी विक्री केली नव्हती त्यांना चांगली रक्कम मिळत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 9 हजार 881 रुपये क्विंटलचा दर मिळाला. तर, सोयाबीनचा सर्वसाधारण दर हा 9 हजार 600 रुपये राहिला.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला आहे. सोयाबीनचा कमाल भाव 9 हजार 881 तर 9 हजार 600 सर्वसाधारण भाव मिळाला आहे. गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात जास्त भाव आहे.
आज लातूरच्या बाजारात 2 हजार 433 क्विंटल सोयाबीची आवक झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करायला घाई केली नाही किंवा सोयाबीन साठवून ठेवले त्या शेतक-यांना आता तिप्पट रक्कम मिळते आहे.बहुतांश शेतकऱ्यांनी तीन ते पाच हजार रुपये क्विंटल प्रमाणे सोयाबीन काढणी झाल्यानंतर मध्ये विकले आहे. सध्या आवक कमी झाल्याने भाव वाढला आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते. येथील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवूण देणारं पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकरी पाहतात. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे. वाशिम कृषी उत्प्न्न बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटलला दर 9500 दर मिळाला आहे. तर, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीतही सोयबीनचा दर 9 हजारांच्या पुढे गेला आहे.
दरवाढीचा फायदा कुणाला?
सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, आणि हे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने नगदी पीक समजले जाते, जिल्ह्यात गेल्या वर्षी 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती, तर यावर्षी आतापर्यंत 3 लाख 55 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
इतर बातम्या:
पीएम पीक विमा योजना: शेतकऱ्यांचे नुकसानाचे 2288.6 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित, नेमकं कारण काय?
(Latur APMC Soybean prices reach to 9600 rupees farmers get benefit know details)