चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा फेसाळत्या चषकला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आज 100 हून अधिक विदेशी आणि देशी दारू दुकानांना परवाने वितरित करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाने हे परवाने दिल्यानंतर देशी आणि विदेशी दारू दुकानदारांनी आपल्या दारू साठ्याची बुकिंग करत आज दुपारपासून हा दारू साठा वितरित करण्यास सुरुवात केली आहे. (Liquor distribution started in Chandrapur after ban lifted)
यात पहिली बाजी मारली आहे ती तेलंगणा सीमेवरील राजुरा तालुक्यातील देवाडा येथील देशी दारू दुकानाने. या ठिकाणी स्वतः दारू दुकानदाराने पहिल्या ग्राहकाला पेग बनवून देत दारू विक्री ला आरंभ केला. यानंतर आता जिल्ह्यातील 100 हून अधिक देशी विदेशी दारू दुकानांमध्ये दारू विक्रीला प्रारंभ झाला आहे. मद्य शौकिनांनी यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.
ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लो दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.
दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. हा अहवाल मंजूर करत ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयानंतर राज्य सरकारवर प्रचंड टीका केली होती. मात्र, काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. दारुबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे काहीही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही. तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी तिखट टीकाही त्यांनी केली. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली, तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतही दारुबंदी उठवण्याचे संकेत दिले होते.
संबंधित बातम्या:
चंद्रपुरात दारुबंदी उठवल्याच्या दुसऱ्याच दिवशी 3 कोटीच्या दारुवर रोडरोलर फिरवला