अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, दिवाणी आणि फौजदारी गुन्हेही दाखल होणार; सोमय्यांचा दावा

| Updated on: Sep 03, 2021 | 2:40 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (kirit somaiya)

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, दिवाणी आणि फौजदारी गुन्हेही दाखल होणार; सोमय्यांचा दावा
किरीट सोमय्या आणि अनिल परब
Follow us on

सिंधुदुर्ग: परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करतानाच परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी तर होणारच आहे. पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. (maharashtra government have to lodge complaint against anil parab, says kirit somaiya)

संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. याच पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परब यांच्या दोन रिसॉर्टवरूनही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

कारवाईचा निर्णय होऊनही कारवाई नाही

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथोरिटीचं परिपत्रक माझ्याकडे आहे. पर्यावरण मंत्रालयाने हा साई रिसोर्ट अनधिकृत असल्याचं घोषित केलं आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करा, असा निर्णयही झाला आहे. तसं मिनिटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनाही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मालकावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण मालक अनिल परब अजून मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील मंत्रीच अनधिकृत बांधकाम करत आहे. सचिव रिसॉर्ट अनधिकृत घोषित करतात. तरीही उद्धव ठाकरे परब यांना मंत्री म्हणून कायम ठेवतात. परब यांची हकालपट्टी तर होणारच. पण त्यांच्याविरोधात फौजदारी आणि सिव्हील कारवाई करावी लागणार. हे काम भाजप करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू

परब यांनी 11 ते 12 कोटींची बेनामी संपत्ती जमवली आहे. सचिन वाझेकडून आलेले हप्ते याकडे वळविले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. जून 2021मध्ये लोकायुक्तांना राज्यपालांनी आदेश दिले. तसेच अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या साई रिसोर्टची लोकायुक्तात सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने पाच पानी अहवाल दिला. त्यात त्यांनी रिसोर्ट अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे. मालकांना नोटीस दिल्या आहेत. रिसोर्ट आणि मालकांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पण ते मंत्री असल्याने कारवाई होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

संचयनीचं प्रकरण 100 दिवसात मार्गी लावू

आम्ही जिल्हाधिकारी आणि एसपींची भेट घेतली. संचयनीतील गुंतवणूकदार मला भेटले. दिल्लीत नारायण राणे, डॉ. भागवत कराड आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुढील 100 दिवसात हा विषय आम्ही मार्गी लावणार आहोत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत संचयनीचे हजारो गुंतवणूकदार 15 वर्षापासून पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करत आहेत. 15 वर्षे झालेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुढील 15 दिवसात या केसचा निकाल लावावा. या प्रकरणातील चारपैकी एक आरोपी सापडला नाही. हे आश्चर्य आहे. सापडत नसेल तर त्याला फरार घोषित करा. नितेश राणे आणि आम्ही या संदर्भात वळसे पाटील आणि डीजींना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नव्या कायद्याचा आधार घेऊ

गुंतवणुकदारांचे पैसे मिळावेत म्हणून संचयनीच्या मालकांच्या संपत्तीचा लिलाव केला नसेल तर ती संपत्ती लिलाव करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. मोदी सरकारने या संदर्भात एक कायदा केला आहे. गरज पडली तर मोदी सरकार आणि आरबीआयची मदत घेऊ, असंही ते म्हणाले. (maharashtra government have to lodge complaint against anil parab, says kirit somaiya)

 

संबंधित बातम्या:

राजू शेट्टींचा ‘करेक्ट कार्यक्रम’ राष्ट्रवादीतूनच?; राजकीय चर्चांना उधाण; राष्ट्रवादीचं उत्तर काय?, वाचा!

बापरे! 3 वर्षांच्या चिमुकलीला लावलेल्या सलायनमध्ये चक्क झुरळ, रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड

आरोपींना कडक शिक्षा होणार, काळजी करू नका, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा; मुख्यमंत्र्यांचा कल्पिता पिंपळेंना शब्द

(maharashtra government have to lodge complaint against anil parab, says kirit somaiya)