जळगाव : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी घडली. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते. दोघांचे मृतदेह दुपारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय 24, रा. खेडी, ता. जळगाव) आणि जयेश रवींद्र माळी (वय 25, रा. वाघनगर, जळगाव) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. या घटनेत मरण पावलेल्या उज्ज्वल पाटील या तरुणाचा काल, वाढदिवस होता. मात्र, दुर्दैवाने वाढदिवशीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरावर एकच शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेडी येथील रहिवासी असलेला उज्ज्वल पाटील याचे ‘एमबीए’चे शिक्षण झालेले होते. तो एका मार्केटिंग कंपनीत कामाला होता. काल त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासोबत वर्षाविहार करण्यासाठी तो आपल्या काही मित्रांसोबत, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल गावापासून काही अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेलेला होता.
पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला
बसाली वॉटरफॉल या ठिकाणी सर्व मित्र एकत्र जमले होते. हे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असून, ते मध्य प्रदेशात मोडते. सायंकाळी उज्ज्वल हा काही मित्रांसोबत धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. तेव्हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो स्वतः आणि त्याचा मित्र जयेश माळी हे दोघे जण पाण्यात बुडाले. या प्रकारानंतर सोबत असलेले इतर मित्र घाबरले. त्यांनी दोघांचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अंधारामुळे त्यांना यश आले नाही.
दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडले
ही घटना घडल्यानंतर आज सकाळी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृत उज्ज्वल आणि जयेश यांचे मृतदेह धबधब्याच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा करून ते उत्तरीय तपासणीसाठी बऱ्हाणपूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.
बुलडाण्यात नदीपात्रात सेल्फीसाठी गेलेला तरुण बुडाला
दुसरीकडे, गेल्या महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली होती. या घटनेनंतर काही तासांनी अनिल सरोकार या तरुणाचा तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात मृतदेह आढळला होता
संबंधित बातम्या :
नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत
नदीत पोहण्याचा मोह जीवावर, यवतमाळचे पाच जण नागपुरात बुडाले
बैल धुण्यासाठी मित्रांसोबत गेला, घरी परतलाच नाही, बुलडाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू