मुंबई: महाडच्या तळीये गावात गुरुवारी दरड कोसळून तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वात आधी ‘टीव्ही9 मराठी’ने दाखवली. महाडमध्ये प्रचंड पूर असतानाही दुर्घटनेची माहिती मिळताच आमची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि राज्यातील सर्वात भीषण आणि दुर्देवी घटना जगासमोर आली. डोंगराचा कडा कोसळल्याने संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं होतं. संसार उघड्यावर पडले होते, माणसं जमिनीखाली गाडली गेली होती, सर्वत्र चिखल आणि पाण्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं. त्यातच पाऊस कोसळत होता. समोरचं चित्रं अत्यंत विदारकर आणि मन हेलावणारं होतं. (Maharashtra landslide: All you need to know Taliye Landslide in mahad)
‘टीव्ही9 मराठी’ला सर्वात आधी या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आमची टीम पाऊस अंगावर झेलत आणि चिखल तुडवत तळीये गावात दाखल झाली. गावातील विदारक दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. लोकांचा आक्रोश, मातीचा ढिगारा उपसण्यात येत असलेला अडथळा, घरांवर कोसळलेले दगड आणि मोठं मोठी झाडं… त्यामुळे संपूर्ण गावच ओसाड वाटत होता. आमच्या टीमने काही प्रत्यक्षदर्शींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळाली ती धक्कादायक आणि काळीज पिळवटणारी माहिती.
महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाडली गेली आहेत.
तळीये हे गाव महाड तालुक्यात आहे. डोंगराच्या कपारीत वसलेलं हे गाव आहे. तळीये गाव रायगडपासून 165 किलोमीटर अंतरावर आहे. तर महाडपासून 15 किलोमीटरवर आहे. 2011च्या जनगणनेनुसार या गावची लोकसंख्या 673 एवढी आहे. या गावात एकूण 173 कुटुंब राहतात. जनगणनेच्या माहितीनुसार गावात 321 पुरुष तर 352 महिला आहेत.
गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अक्रित घडलं… जोरदार पाऊस सुरु होता… माणसं आपापल्या घरात होती… त्याचवेळी डोंगरकडा अनेक घरांवर कोसळला. डोंगरकडा खाली येतोय हे दृश्य पाहून काही माणसं बोंबलत बाहेर पळाली. मी आणि माझी तीन मुलं, आम्हीही घराबाहेर पळालो… आम्ही बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं…. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, अशा जड अंतकरणाने घटनेची आपबिती प्रत्यक्षदर्शी बबन सकपाळ यांनी सांगितली.
आम्ही नवं घर बांधलं होतं. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण गुरुवारी अक्रित घडलं. पावसाने डोंगरकडा कोसळला. आमचं घरं कोसळलं… वसरं आलं.. वसरं आलं… असं बोंबलत आम्ही पळालो… तीन मुलगे मुंबईला आहेत, इथं तिघे राहात होतो.. आता काय घरात राहिलं नाही.. धान्य पाणी सगळं गेलं … मी कालपासून शेतात राहतोय.. काल वडापाव दिला होता, आता खायला काही नाही… अंथरुण पांघरुन नाही, अवस्था बिकट आहे, अशा शब्दात आपल्यावर ओढावलेल्या वाईट परिस्थितीचं बबन सकपाळ यांनी कथन केलं.
दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले. पण त्यांना काय माहीत काळ इथेच लपून बसला. जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. सर्व गेले. घरेही जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल झाला होता, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. (Maharashtra landslide: All you need to know Taliye Landslide in mahad)
संबंधित बातम्या:
Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना
मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांची खोचक टीका
(Maharashtra landslide: All you need to know Taliye Landslide in mahad)