कराड : डोंगरात जमिनीला भेगा पडून घरांना तडे गेल्याने ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी व शिंदेवाडी जितकरवाडी येथील 32 कुटुंबातील 80 जणांनी आपले गाव सोडून ढेबेवाडी येथे आश्रय घेतला. गावाजवळचा पूल तुटल्याने त्यावर शिड्या लावून आणि मानवी साखळी करून त्यांनी वांगनदी ओलांडली. पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने हे मदत कार्य राबविण्यात आले.
मराठवाडी धरणाच्या जलाशयापासूनच लगतच डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी या छोट्याशा वाड्या वसलेल्या आहेत. यापैकी जितकरवाडी लगतचा डोंगर घसरून दरडी कोसळू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी तेथील 23 कुटुंबातील 93 जणांना सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील विद्यालयात हलविण्यात आले आहे.
जितकरवाडी जवळच ओढ्यापलीकडे असलेल्या निगडे ग्रामपंचायतीच्या कक्षेतील धनावडेवाडी व शिंदेवाडी परिसरातही डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या काळजाचा ठोकाच चुकला, गावाबाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग,खंडीत वीजपुरवठा,नॉट रिचेबल मोबाईल आणि घरात लागलेले पाण्याचे उमाळे अशा कठीण परिस्थितीत संपर्कहीन झालेल्या धनावडेवाडीकरांनी आज पावसाची उघडीप मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाच्या मदतीने तुटलेल्या पुलाला शिड्यालावून आणि छाती एवढ्या पाण्यात मानवी साखळी तयार करून नदी ओलांडली.
सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह तलाठी डी.डी डोंगरे,ग्रामसेवक थोरात,दीपक सुर्वे,पोलीस कर्मचारी नवनाथ कुंभार, कपिल आगलावे, गणेश शेळके, होमगार्ड आशिष पुजारी, संग्राम देशमुख, स्वप्नील पानवळ, शुभम कचरे, विशाल मोरे यांच्या टीमने तसेच उमरकांचनचे मनोज मोहिते आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे स्थानिक ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते यांनी स्वतः वाहत्या पाण्यात उतरून मदतकार्य राबविले.
यावेळी शंकर पवार , प्रदीप भिसे, पराग ढोले, संभाजी कानवटे,राधेश्याम खांडेकर यांनीही सहकार्य केलेन .शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे युवा नेते यशराज देसाई यांनी जीवनावश्यक साहित्याचे किट,ब्लॅंकेट अशी मदत स्थलांतरित कुटुंबांसाठी सुपूर्द केली.
ढेबेवाडी येथील साई मंगलम कार्यालयात त्या सर्व कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून कार्यालय मालकांनी कार्यालयासह तेथील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
(Maharashtra Rain Flood Karad Dhebewadi Child With 23 Family Rescue)
हे ही वाचा :