कोणतेही नवीन सरकार आले की ते कायम मागील सरकारला दुषणं देत राहते. सर्वच खापर जुन्या सरकारवर फोडून धन्यता मानण्यात येते. मराठवाड्यातील भाजप नेत्याचे विधान सध्या यामुळेच चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण गेल्याचा अजब दावा त्यांनी केला. हे आरक्षण घालविण्यासाठी महाविकास आघाडीच कारणीभूत असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे आता जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
पांढऱ्या पायाच्या सरकारने आरक्षण घालवलं
भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीवर कोरडे ओढले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले, असा दावा लोणीकर यांनी केला. ओबीसी आरक्षण सुद्धा याच पांढऱ्या पायाच्या आघाडी सरकार मुळे गेल्याचे ते म्हणाले. परभणी दौऱ्यावर असताना बबनराव लोणीकर यांनी हे विधान केले. त्यांच्या विधानाची एकच चर्चा रंगली आहे.
चाळीस वर्षांत काय केलं?
बबनराव लोणीकर यांनी मराठा आरक्षणावरुन काँग्रेसला धारेवर धरले. त्यांनी मागील सरकारवर निशाणा साधला. चाळीस वर्ष राज्यात मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षणावर चर्चा सुद्धा झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. मात्र आमच्या सरकारमध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं, असे लोणीकर म्हणाले.
यंदाची लोकसभा निवडणूक विकासावर न होता जातीपातीच्या मुद्द्यावर लढवली गेली. अपप्रचारामुळे मराठवाड्यात आमचा पराभव झाला, असा आरोप त्यांनी केला. या अपप्रचारामुळेच मराठवाड्यात एकही जागा न आल्याचा आरोप त्यांनी केला. मराठवाड्यात एकच जागा महायुतीच्या गळाला लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे सेनेने एका जागेची कमाई केली.
देव आणि देवेंद्राला ठाऊक
संभावित मंत्रिमंडळ विस्तार मध्ये माझा समावेश असेल की नाही हे देव आणि देवेंद्र यांनाच माहीत, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.मात्र मी आशावादी माणूस आहे मी चांगलं काम केलं मला संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात लोणीकर यांना लॉटरी लागू शकते, अशी चर्चा रंगली आहे.