परभणी : मराठा सेवा संघाचा तीन दिवसीय महा अधिवेशन परभणीत आज पार पडला. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या समारोपीय भाषणाने अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनात महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोह अंतर्गत गुन्हे दाखल करावे. तसेच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावे. यासह दहा ठराव मंजूर करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दहा ठराव पास करून राज्य कार्यकारिणी मार्फत राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही पाठवणार आहोत, असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं.
केंद्र सरकार कुठेतरी राज्यपालांची पाठराखण करत असावे. कारण पाठराखण केली नसती तर राज्यपालांना त्यांनी हटवलं असतं. केंद्र सरकारला येथे दंगल व्हावी असं अपेक्षित असेल, असा आरोपही पुरुषोत्तम खेडकर यांनी केला. मात्र आम्ही संविधानिक मार्गाने त्याचा पाठपुरावा करत राहू. केंद्र सरकार सहजासहजी राज्यपालांना हटवेल असं आज तरी वाटत नाही, असंही ते म्हणाले.
जिजाऊ जन्मोत्सव या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना लेखी निमंत्रण पाठवलेलं आहे. दोघांनी कार्यक्रमाला यावं असा प्रयत्न आमचा चालू आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी होकारही दिलेला नाही. तसेच नकारही दिलेला नाही. कार्यक्रमाला येऊ अस तोंडी संदेश मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे, असं पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितलं.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड, महाविकास आघाडी शिवाय 288 विधानसभा आणि 48 लोकसभेवर उतरली, तर बहुतांशी ठिकाणी शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीला विजय मिळेल. सध्या समाजामध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीबद्दल सकारात्मक वातावरण आहे. आणि 2024 पर्यंत राहील अशी अपेक्षा असल्याचंही पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.