वाशिम : राज्यात वाढत्या लोकसंख्ये सोबतच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ग्रामीण भागात मात्र गावठाणाचे अभिलेख उपलब्ध नसल्याने अनेकदा वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे विकासकामांची गती मंदावतेय. ग्रामस्थांच्या मालकीच्या असलेल्या मालमत्तेचे अधिकृत मालकीपत्र नसल्याने त्यांची आर्थिक पतही निर्माण होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून भूस्वामित्व योजने अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्यात नुकतीच या मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. मागील 5 दिवसांमध्ये 17 पेक्षा अधिक गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली.
वाशिममध्ये ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी, जमिनीच्या वादांवर प्रशासनाचं पाऊल@bb_thorat #Washim #LandSurvey #वाशीम #जमीन pic.twitter.com/5cZcKNakSU
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 10, 2021
राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमीनीचे जीआयएस प्रणालीव्दारे सर्व्हेक्षण व भूमापन स्वामित्व योजनेअंतर्गत करण्यात येत आहे.वाशीम जिल्ह्यात नुकतीच या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. यामाध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. या नकाशातील मिळकतींना ग्रामपंचायतमधील मिळकत रजिस्टरला जोडण्यात येणार आहे.
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणी करण्यात येत आहे. यामुळे मिळकतीचा नकाशा तयार होऊन सिमा निश्चित होणार आहेत. या प्रक्रियेमुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र स्पष्ट होऊन मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि मिळकतींना बाजारपेठेमध्ये अधिक स्थान मिळून गावाची आर्थिक पत उंचावण्यास मदत होणार आहे.
यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आणि मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गावस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या हिताच्या असलेल्या योजनेस सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांच्याकडून करण्यात येत आहे.