कराड, सातारा : साक्षात माझे मरण मी पाहिले, माझं मुंडकं तेव्हढं बाहेर होतं. बाकी सगळं अंग चिखलात रूतलं होतं. 24 तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुळे जीव वाचला, पोरा मी माझं मरण डोळ्यानं बघितलंय, अशी प्रतिक्रिया मीरगावच्या भूस्खलनातून वाचलेल्या सत्तीरीतील एका आजीने दिली. सरसाबाई देवजी बाकाडे असं त्यांचं नाव आहे. गाळात रुतून बसलेल्या, जीवाच्या अकांताने 24 तास धडपडणाऱ्या सरसाबाईंना चार दिवसांनी शब्द फुटलेत. ते 24 तास त्यांना आजही मरणाची प्रचिती देतात.
पाटण तालुक्यातील कोयनानगर जवळील मीरगावात दरड कोसळी होती. या गावातील आजी सरसाबाई बाकडे 24 तासापेक्षा जास्त काळ घरावर कोसळलेल्या दरडीच्या चिखलात रुतून बसल्या होत्या. गुरुवारी झालेल्या भूस्खलनात सरसाबाईंचे घर वाहून गेले. घरात सरसाबाई, त्यांच्या सूनबाई श्रीमती सुमन, नातू व्यंकटेश, नात अनुष्का असे राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षापूर्वी वारला. घरी एवढेच लोक असतात.
मुसळधार पावसाने गुरुवारी मीरगाववर आरिष्ट कोसळले. गावातील 19 जण ढिगाराखाली गाडले गेल्याची भीती होती. सायंकाळी डोंगरातून गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत झालेले भूस्खलन अधिक धडकी भरवणारे ठरले. त्यातून अनेकजण वाचलेही. मात्र देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण मीरगावच्या आज्जीच्या बाबतीत खरी ठरली.
सरसाबाई यांचे घर दहा फूट चिखलात रूतले. काय करावे कळण्यापूर्वीच जो तो जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत धावू लागला. सरसाबाईंचे सून, नातू नातही धावली. मात्र घर चिखलाखाली बुजून गेले होते. घरात आजी दरडीच्या चिखलात रूतून बसली. सुरक्षीतस्थळी आलेल्या सून सुमन यांना आजी आपल्यासोबत बाहेर आली नसल्याचे समजताच त्यांच्या दुःखाला पारवार राहिला नव्हता.
दुसऱ्या दिवशी शोध सुरू झाला. त्याता पाऊस, चिखलाचा मोठा अडथळा येत होता. चोवीस तास ओलांडले आणि चिखलात माखलेल्या आजी रांगत बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत, असे बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला दिसले. वेगाने त्यांनी आजींना चिखलातून बाहेर काढून, सुरक्षितस्थळी नेले. आजी सरसाबाई चोवीस तास चिखलात अडकल्या होत्या. त्यांना पाहून नातेवाईकांच्याही आश्रूंचा बांध फुटला.
मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या आजींना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्या काहीच बोलत नव्हत्या. सर्वच बाधीतांना कोयनानगरच्या मराठी शाळेत आणले आहे. तेथेही आजी काही बोलल्या नाहीत. मात्र आज त्या पहिल्यांदाच बोलल्या आणि त्यांच्याही आश्रूंचा बांध मोकळा झाला. “काय सांगू लेका त्या दिवशी माझे मरणच म्या पाहिले”, असे सांगून सरसाबाई यांनी बिथरत्या शब्दात निसर्गाचा पाहिलेला प्रलय सांगितला.
गावावर दरड कोसळली त्याच्या आवाजाने अंगात कापरे भरले होते, अशी माहिती प्रत्यक्ष हजर असलेल्या बचावलेल्या गावकऱ्यांनी दिली.
यापुढे त्याठिकाणी आमची राहण्याचे धाडस होणार नाही, आम्हाला इतर ठिकाणी राहण्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशी मागणी गावातील बचावलेल्या महिलांनी केली आहे.
संबंधित बातम्या
BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू