बुलढाणा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या जाहिरातीतून शिंदे गटाला डिवचलं आहे. या जाहिरातीतून राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार संबोधलं आहे. राऊत यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतला आहे. आम्ही गद्दार नाही. खुद्दार आहोत. हे आम्ही वारंवार स्पष्ट केलं आहे, असं सांगतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सवंगड्यांना गाडणारा पैदा व्हायचा आहे, असा जोरदार हल्ला संजय गायकवाड यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आम्ही संजय राऊत यांची फार काही दखल घेत नाही. राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्याचा हिशेब द्यावा. त्यांनी जी अभद्र युती केली तो बाळासाहेबांचे विचार नाहीत. अगोदर ते बंद करावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चमचेगिरी करणारे संजय राऊत बाळासाहेबांना सल्यूट करूच शकत नाही, असं सांगतानाच तू जर ओरिजीनाल बाळासाहेबांना मानणारा असशील तर पाहिला राजीनामा दे. मग खासदार होऊन दाखव, असं आव्हानच संजय गायकवाड यांनी राऊत यांना दिलं.
पक्षप्रमुख हा घरात बसून पक्ष चालवणारा नसावा. पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षप्रमुख असला पाहिजे. कार्यकर्त्यांना वेळ देणारा पक्षप्रमुख असला पाहिजे. विचारधारा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मिळणारी नसावी. हे सगळे गुण एकनाथ शिंदे यांच्यात आहात. पक्षप्रमुख पदासाठी योग्य असतील तर ते एकनाथ शिंदे हेच आहेत, असा दावा त्यांनी केला.
तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी किती खोके घेतले. महाराष्ट्राला कळू द्या. आम्ही भाजप सोबत गेलो ते फक्त हिंदुत्वाचे विचार म्हणून गेलो, असा दावाही त्यांनी केला.
अफझल खाना हा किती क्रूर होता हे इतिहास सांगतो. अफझल खान छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायला निघाला तेव्हा त्याला त्याच्या बायकांनी अडविले होते. त्यावेळी अफजल खानने स्वतःच्या 59 बायका मारून टाकल्या. अन् तरीही अफजल खानला तुम्ही दयाळू म्हणता? म्हणजे तुमच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
तुमच्या धमकीचे समर्थन करत नाही. पण तुम्ही कोणाची वफादरी करता? तो तुमचा वंशज होता का? तुम्ही म्हणता महाराष्ट्राला संभाजी महाराज नगर नाव द्या. विधानसभेत तुम्ही टाहो फोडून बोंबलत होता. आता काय पुळका आला तुम्हाला? असा सवाल त्यांनी केला.