Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; आजच ‘या’ कोर्टात हजर राहणार

| Updated on: Jan 18, 2023 | 7:53 AM

ऑक्टोबर 2008 राज ठाकरेंना मुंबईत अटक झाली होती. राज यांच्या अटकेनंतर मनसे सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती.

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; आजच या कोर्टात हजर राहणार
Raj Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात? राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी कोर्टाने जारी केलेलं अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता परळी कोर्टात हजर राहणार आहेत. त्यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबर 2008 राज ठाकरेंना मुंबईत अटक झाली होती. राज यांच्या अटकेनंतर मनसे सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. 3 आणि 12 जानेवारी रोजी राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.

पण ते कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

राज ठाकरे आज सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरने जाणार आहेत. त्यानंतर ते सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहणार आहेत. कोर्टाचे काम आटोपल्यानंतर ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणार आहेत.

यावेळी ते कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही देणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे साधारण दुपारी दीडच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या बीड दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राज ठाकरे यावेळी मीडियाशी संवाद साधणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.