अकोला: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार दौरे करत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता मनसेनं मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला महापालिका निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती मनसेचे विठ्ठल लोखंडकर यांनी दिली आहे.
मनसे अकोला महापालिका स्वबळावर लढवणार
अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्ररित्या लढणार आहे. त्यासाठी पक्षस्तरावर तयारी सुरू झाली असून अकोला महानगराचा सर्वांगीण विकासाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून निवडणुकांना सामोरं जाणार असून मनसे एक भक्कम पर्याय देणार असल्याचे माहिती मनसेचे अकोला निरीक्षक विठ्ठल लोखंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अकोल्यातील सर्व निवडणुकांमध्ये मनसे ताकदीनं लढणार
मनसेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना लोखंडकार म्हणाले की , जिल्ह्यातील नगर परिषदा , जिल्हा परिषदेसह मनपाची निवडणूक मनसे पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे.अकोला जिल्ह्यात पक्षबांधणी,विस्तार,निवडणुकी संदर्भात आपणास पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी अधिकार प्रदान केले आहेत… त्याअनुषंगाने पक्षाची कार्यकारिणी , आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
नाशिकच्या धर्तीवर अकोल्याचा विकास
आगामी निवडणुकीत युती करण्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसला तरी याबाबतीत सर्वाधिकार पक्षाध्यक्ष यांच्याकडे आहेत. मनसेने नाशिक शहराचा विकास,गोदावरीकाठ विकासाच्या धर्तीवर अकोला शहरातील मोर्णा नदीचा विकास,शहरविकासाचा ब्ल्युप्रिंट मनसे सादर करणार आहे. तर, जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सुध्दा पक्षांतर्गत तयारी करण्यात आली असून या निवडणुकांसाठी देखील उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा अकोला संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकार यांनी शासकीय विश्राम गृहतील पत्रकार परिषद मध्ये दिली असून यापुढे कोणताही कार्यकर्ता मुंबईशी संपर्कात राहणार नसल्याचा ही सल्ला यावेळी मनसे उपाध्यक्ष यांनी दिला आहे.
इतर बातम्या
MNS will contest Akola Municipal Corporation Election said by Vitthal Lokhandkar