यवतमाळ : पुणे आणि नाशिक पाठोपाठ आता विदर्भातंही मनसे आपली ताकद वाढवायला लागलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विदर्भातील मनसे नेते पक्षातील इनकमिंगवर जास्त भर देतातय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात, मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे मनसेने वणी, मारेगाव तालुक्यात पक्षप्रवेश मेळावेच घेतले आहे. यात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती आहे. तसेच आणखी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत, अशी माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या 24 तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.
दरम्यान, काल राज ठाकरे पुण्यात होते. काल त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदारसंघांचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचनाही केल्या. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पुण्यात भाजपबरोबर युती करण्याची कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी पुण्याचा महापौर मनसे ठरवणार आहे, असंही मोरे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजता पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक झाली. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित होते. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. शनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर सकाळी 10 वाजता 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर सकाळी 11 वाजता 18 आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक झाली.
हेही वाचा : ‘तात्यासाहेबां’चे भव्य पोस्टर, पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंच्या वाढदिवसाला कोरोना नियमांना हरताळ