अहमदनगर : दुकानासमोर बॅरिकेट लावण्यावरून दोन व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादत एका गटाकडून चाकूहल्ला करण्यात आला. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे व्यापारी आक्रमक झाले. त्यांनी शनिवारी बाजारपेठ बंद केली. विविध व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले. या घटनेत सावेडी येथील दीपक रमेश नवलानी जखमी झाले. कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात माझ्या खुनाचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले.
पोलिसांनी अमर हमीद शेख आणि रिजवान अमीन सय्यद यांना अटक केली. हमजा शौकत अली आणि त्याचा भाऊ हे फरार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
हमजा शौकत अली याने आपल्या दुकानाजवळ बॅरिकेट्स लावले. नवलानी यांना दुकानात जाण्यासाठी अडथळा येत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. नवलानी यांना शिविगाळ करण्यात आली. मध्यस्तीने वाद मिटला. पण, संध्याकाळी नवलानी उभे असताना अमर हमीद शेख तेथे आला. नवलानी यांच्या छातीवर पोटावर वार केले. बाजूला उभ्या असलेल्या प्रवीण बोगावत यांनाही दुखापत झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एकत्र येत शनिवारी बाजारपेठ बंद केली.
कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी भाजप खासदार सुजय विखे आक्रमक झालेत. दहा दिवसांत गुंडांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा सुजय विखे यांनी दिला. नगर शहरामध्ये व्यापाऱ्यांवर वारंवार हल्ले सुरू आहेत. हल्लेखोरांचा बंदोबस्त तातडीने केला जाईल, असं विखे म्हणाले.
नगर शहरातील अवैध व्यवसाय मटके, बिंगो, जुगार आदी अवैद्य व्यवसाय येत्या दहा दिवसात तातडीने बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देणार असल्याचं सुजय विखे यांनी म्हंटलं. पोलीस प्रशासनाने कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. नगर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असा सज्जड दम त्यांनी दिला.