अमरावती : त्रिपुरामधील कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात काही शहरांमध्ये अमटले. यामध्ये अमरावती शहर तुलनेने जास्त होरपळले. या शहरात जमावाने मोठी तोडफोड केली. तसेच काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अमरावतीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. हिंदू-मुस्लीम वाद अशी किनार या तणावामागे आहे. मात्र सगळीकडे वातावरण दूषित झालेले असताना अमरावतीमध्ये मुस्लीम बहुल परिसरात बंधुत्वाचा झरा अजूनही वाहत आहे. येथे हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधवांकडून केली जात आहे.
अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम बहुल परिसरात असलेल्या हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लीम करत आहेत. हिंदू-मुस्लीम एकतेचा चांगला संदेश दिला जात आहे. अमरावतीच्या इतवारी हा मुस्लीम बहुल परिसर आहे. मात्र त्याच परिसरात हिंदू धर्मियांचं शिव मंदिर आहे. हे मंदिर अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे. या हिंसाचाराला हिंदू-मुस्लीमचा रंग देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मंदिराला कोणी काही करू नये, म्हणून मुस्लीम बांधव सरसावले आहेत. या मंदिराचे मुस्लिमांकडून रक्षण करण्यात येत आहे.
“सगळ्यांच्या भावना मंदिर, मशीद, गुरुद्वारासोबत जुळलेल्या असतात. त्या भावना दुखावता कामा नये, म्हणून आम्ही परिसरातील मंदिराची सुरक्षा करत आहोत,” अशी भावना येथील मुस्लीम बांधवांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेला आता पाच दिवस झाले आहेत. सध्या अमरावतीमध्ये संचारबंदी सुरू आहे. मात्र ही परिस्थिती आता पूर्वपदावर आणण्याची गरज व्यक्त केली जातेय. यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहे आणि हा हिंसाचार कसा घडला याविषयीची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलीय. अमरावतीमध्ये आम्ही शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदू-मुस्लीम सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावत आहोत. अमरावतीमध्ये जे घडलं तो एक कट होता. कट रचला गेला होता. ऍक्शनला रीऍक्शन देण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला आहे. ज्यांनी घडवलं तेच आरोप करत सुटले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. ब्रॉड बँड सेवा आज किंवा उद्यापर्यंत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिलीय.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :