नांदेड : जिल्ह्यात 1 कोटी झाडे लावण्याचा नांदेड प्रशासनाचा संकल्प असून त्यासाठी गावांची मदत घेतली जातेय… हदगाव तालुक्यातील जवळगाव या संपूर्ण गावाने झाडे लावण्याचा एक चांगला आदर्श निर्माण केलाय… जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या जवळगाव गावातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावले असून त्याचे संगोपन कुटुंब करणार आहे.
गावाच्या प्रवेशद्वारापासून झाडे लावण्यात आल्याने जवळगाव आदर्श गाव ठरलंय. तसेच मियावाकी पद्धतीने गावात तब्बल 3 हजार झाडे लावण्यात आली आहेत. गावात जिथे जिथे गायरान जमीन, मोकळी , पडीक जागा आहे तिथे झाडे लावण्यात येणार आहेत. वन परिक्षेत्र कमी होत असल्याने आता गावांची मदत घेऊन प्रशासन झाडे लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत आहे, त्याला गावांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
वृक्षारोपणाच्या या चळवळीत ग्रामस्थाचा सहभाग वाढावा यासाठी आमदार माधवराव पाटील कल्पवृक्षांच्या झाडाची निवड केलीय. कल्पवृक्ष अर्थात नारळाच्या झाडांची निवड वृक्षारोपणासाठी केलीय. ही झाडे लावल्यानंतर त्याचे संगोपन करणाऱ्याला त्यातून येणाऱ्या नारळाच्या माध्यमातून उत्पन्न होईल, अशी या मागची भावना आहे. त्याकरिता जवळगाव इथल्या सर्व कुटुंब प्रमुखांना बोलावून त्यांना कल्पवृक्षांचे रोपटं भेट म्हणून देण्यात आलय. ग्रामस्थांनी आपल्या दारात हे झाड लावून त्याचे संगोपन करायचे आहे.
जवळगाव इथल्या ग्रामस्थांनी गावातील हिंदू स्मशानभूमीत मियावाकी पद्धतीने तीन हजार रोपट्यांचं वृक्षारोपण केलंय. त्याचबरोबर मुस्लिम कब्रस्थानात देखील दोन हजार झाडे लावली आहेत. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी जवळगाव ग्रामपंचायतीने घेतलीय. झाडांची नीट आणि जलदगतीने वाढ व्हावी यासाठी आवश्यक ती खते आणि पाणीपुरवठा ग्रामपंचायत करणार आहे. त्यामुळे जवळगावच्या दोन्ही धर्माच्या स्मशानभूमी आता बगीचा सारख्या दिसतायत.
हदगाव-हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील यांचे मुळगाव असलेल्या जवळगावची आणखी एक ओळख आहे. या गावच्या ग्रामपंचायत निवडणूक गेल्या साठ वर्षांपासून बिनविरोधपणे होतात. आमदारांचे स्वर्गीय वडील आणि भाऊ यांनी गावात चाळीस वर्षात कधीही गटबाजी होऊ दिलेली नाही. तर आता स्वतः आमदार माधवराव पाटील वीस वर्षांपासून यांनी देखील ही परंपरा जोपासलीय.
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात या अनोख्या प्रथेमुळे जवळगाव प्रसिद्ध झालेलं आहे. याच गावाने आता वृक्षारोपणाची चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी पुढाकार घेतलाय. जवळगावात सुरु झालेली वृक्षारोपणाची चळवळ आपल्या मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात राबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलय.
(Nanded Administration to plant 1 crore trees in the district, good support of Jawalgaon, one family one tree Decision)
हे ही वाचा :
पावसाने ओढ दिल्याने पांढऱ्या सोन्याच्या पेरणीत घट, कपाशीचं क्षेत्र घटण्याची भीती