नांदेड : नांदेडमध्ये कोरोना लस घेण्यासाठी सर्वसामान्य गर्दी करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 7 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. नांदेड जिल्ह्यात 25 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवलंय. (Nanded Corona Vaccination 7 lakh people Vaccinated 25 lakh target Collector Vipin Itankar)
ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, लसीपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प घेण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर नागरिकांनी लस घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर हे नांदेडकरांना वारंवार करतायत.
जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 672 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 91 हजार 322 एवढी झाली असून यातील 88 हजार 762 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 56 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेचे संकेत असताना, राज्यातील विविध शहरात रुग्णवाढ होत असताना नांदेडमध्ये मात्र कोरोना रुग्ण संख्या अगदी आटोक्यात आहे. शासन आणि जिल्हा प्रशासनाचं हे मोठं यश म्हणावं लागेल. शासन-प्रशासनाच्या अटी निर्बंधांना तसंच उपाययोजनांना नांदेडकर चांगली साथ देत आहे. म्हणूनच कोरोनाला लगाम घालण्यात नांदेडकर यशस्वी ठरले आहेत. पण लढाई संपलेली नाही. लसीकरण मोठ्या वेगात अपेक्षित आहे. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखता शासनाने घालून दिलेले नियम अटी पाळायला हवेत, अशा प्रतिक्रिया नांदेडकरांनी व्यक्त केल्या.
(Nanded Corona Vaccination 7 lakh people Vaccinated 25 lakh target Collector Vipin Itankar)
हे ही वाचा :
Video : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली!