नांदेडः नांदेडमध्ये आज सलग पाचव्या दिवशीदेखील सूर्यदर्शन झाले नसून पावसाची संततधार (Nanded Rain) सुरूच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रीपासून ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नांदेड शहरात चोहीकडे पाणी साचलेले आहे. तसेच अर्धापुर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेकडो हेक्टर जमिनिसह रस्ते पाण्याखाली गेलेयत. विष्णुपुरी धरण (Vishnupuri Dam) जवळपास 80 टक्के भरलं आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी सह सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहतायत. नांदेडमध्ये पैनगंगा, गोदावरी (Godavari river) आणि आसना ह्या तिन्ही नद्या तुडुंब भरल्यामुळे नदीकाठच्या असंख्य गावांचा संपर्क तुटलाय. सलग पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेय. हजारो हेक्टर जमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पावसाची संततधार सुरूच असल्याने असंख्य रस्ते हे पाण्याखाली बुडाले आहेत. किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावं लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. कच्च्या रस्त्यातून प्रवास करावा लागतोय.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहराला पाण्याच्या विळख्याने वेढलंय, बिलोली तालुक्यात रात्री सर्वदूर अतिवृष्टी झालीय. त्यामुळे बिलोली शहरासह तालुक्यात सर्वत्र पाणी साचलेलं दिसतंय. तर बिलोली मध्ये संततधार पावसाने घरं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जुने बांधकाम असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन बिलोली इथल्या तहसीलदारांनी केलंय.
हिमायतनगर तालुक्यात 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गानं हिमायतनगर गाठावं लागत आहे. आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना, पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावासह परिसरात सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळं जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं आहे. वडगाव जवळील पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन दिवसापासून वडगावचा संपर्क तुटला आहे.
संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून प्रवाहित झालीय, त्यामुळे सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा रुद्रावतार पहायला मिळतोय. या पूर सदृश्य पाण्यामुळे हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या तिन्ही तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय, त्याच बरोबर काही गावातील विद्युत पुरवठा देखील ठप्प झालाय. काल मध्यरात्री पासून सुरू झालेला पाऊस आज सकाळ पर्यंत सातत्याने बरसतोय. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर येण्याची भीती व्यक्त केल्या जातेय, दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय.