नांदेड : नांदेडमध्ये एका महिलेच्या प्लॉटवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे असहाय्य असलेली एकटी महिला दहशतीत वावरत आहे. वडील आणि दोन भावांच्या अकाली मृत्युमुळे नांदेडमध्ये कमल पत्रावळी या महिलेवर कुटुंबाची जवाबदारी आलीय. मात्र ही एकटी महिला असल्याचे पाहून भूखंड माफिया रमेश पारसेवार याने आपल्या साथीदारांसह मिळून तिच्या प्लॉटवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा सगळा प्रकार cctv कॅमेरात कैद झाल्याने पोलिसांत गुन्हा नोंद झालाय. मात्र गुन्हा नोंद होऊनही आरोपी मोकाटच आहे. या महिलेचे कुटुंब प्रचंड दहशतीच्या खाली वावरत आहे. न्यायालयाने काल या आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारलाय. तरीही आरोपी अटक होत नाही. त्यामुळे या महिलेने आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय.
ग्रामीण पोलीस ठाणे नांदेडचे तपास अधिकारी अशोक घोरबांड म्हणतात, कमल पत्रावळी यांच्या वडिलांची संपत्ती आहे. त्यावर काही लोकांनी कब्जा केला. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कागदपत्रांची फाईल न्यायालयासमोर हजर केली. या आरोपीची अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केली.
कमल पत्रावळी म्हणाल्या, खूप लोकं माझ्या अंगावर धावून आले. गेटवरून उडी मारून काही जण आतमध्ये शिरले. पाना-पेंचीस घेऊन ते मला मारहाण करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे मला प्रचंड भीती वाटली. त्यामुळे मी गोंधळले. मी पोलिसांना फोन केला. तात्काळ मदत मिळाली. त्यामुळे माझ्यावरील हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. दोन्ही भाऊ गेले. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेतला जात असल्याचा आरोप कमल पत्रावळी यांनी केलाय.