नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे नद्यांना पूर देखील आला. याचदरम्यान मुखेड तालुक्यातील राजुरा इथला पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. पूल वाहून गेल्याने पाण्यातूनच स्थानिकांना ये-जा करावी लागतेय. थोड्याश्या पावसाने (Rain) देखील या ठिकाणी ओढ्याला पूर येत असल्याने शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून शाळा गाठावी लागतेय. ग्रामस्थांनी याठिकाणी पुन्हा पुल उभा करून देण्याची मागणी केलीयं. मात्र, याकडे प्रशासनाने अजून लक्ष दिले नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना धोकादायक (Dangerous) पध्दतीने प्रवास करावा लागतोयं.
अतिवृष्टीमुळे पुल वाहून गेल्याने गावातील लहान्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या जीव मुठीत धरून ये-जा करावी लागतंय. तसेच मुखेड ते देगलूर या मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. हा पूल तात्काळ दुरुस्त करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय. कारण पुल नसल्याने नागरिकांना गावाच्या बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.
नांदेड शहरातही रस्त्यांची पार चाळण झालीयं. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. रस्तावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. त्यातच यंदा पावसाळ्याच्या अगोदर शहरातील खड्डे बुजवण्याचे कष्ट मनपाने घेतलेच नाहीत, त्यामुळे आहेत ते खड्डे अजून मोठे बनत आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज देखील येत नाही.