नांदेडः जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. महिनाभरापूर्वी चोरट्यांनी (Nanded Theft) चोरून नेलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मूर्ती परत पाठवल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी विशेष पॅकिंग करत या मूर्ती ज्या ठिकाणाहून चोरल्या होत्या, तेथे एका ऑटोरिक्षाद्वारे परत पाठवल्या. जिल्ह्यातल्या कंदकुर्ती (Kandurti) गावातील ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. कंदकुर्ती हे गाव RSS चे पहिले सरसंघचालक केशवराव हेडगेवार (Keshavrao Hedgewar) यांचे असून ते महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर येते. याच गावातील ही घटना सध्या दोन्ही राज्यांतील चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर कंदकुर्ती हे गाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक केशवराव हेडगेवार यांचे हे गाव प्रसिद्ध आहे. गावातील तीनशे वर्षांहून जुन्या असलेल्या राम मंदिरात साधारण महिनाभरापूर्वी चोरी केली होती. या चोरीत मंदिरातील अत्यंत दुर्मिळ अशा मूर्ती पळवल्या होत्या. तसेच मंदिरातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिनेही पळवले होते. या विरोधात परिसरातील पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. महिनाभरापासून नांदेडमधील पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र चोरट्यांचा शोध लागत नव्हता.
चोरांपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. तरीही चोरट्यांनी या मूर्ती मंदिरात साभार परत का केल्या, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, पोलिस या तपासात अपयशी ठरल्यामुळे पुढील ठोस पावलं उचलण्यात येऊ लागली. दोन दिवसांपूर्वी काही संघटनांनी या चोरीचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. ही बातमी ऐकताच चोरट्यांनी चोरी केलेले सोन्या-चांदीचे सर्व दागिने आणि कोट्यवधी रुपये किंमतीच्या प्राचीन मूर्त्या एका बॉक्समध्ये टाकून हे पार्सल करत ऑटोरिक्षाद्वारे मंदिरात परत पाठवल्या आहेत. या चोरीचा तपास सीबीआयकडे गेल्यास आपण पकडले जाऊ या भीतीपोटी चोरट्यांनी चोरीचा सगळा मुद्देमाल परत पाठवला, अशी चर्चा सध्या नांदेडमध्ये रंगली आहे. तसेच चोरी झालेल्या सगळ्या मुर्त्या आणि दागिने परत मिळाल्याने स्थानिक भाविकांनी समाधान व्यक्त केलय.
इतर बातम्या-