आता तारीख नाही, अ‍ॅटॅक होईल, मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका: नरेंद्र पाटील

| Updated on: Jul 04, 2021 | 2:28 PM

आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अ‍ॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका. (narendra patil)

आता तारीख नाही, अ‍ॅटॅक होईल, मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका: नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील
Follow us on

सोलापूर: आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अ‍ॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केलं. (narendra patil slams mahavikas aghadi over Maratha Reservation )

नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आज सोलापुरात प्रचंड मोठ्या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला हजारो मराठा तरूण सहभागी झाले होते. यावेळी मोर्चकऱ्यांना संबोधित करताना पाटील यांनी हे आवाहन केलं. या पुढे प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी आता तारीख देणार नाही. थेट अ‍ॅटॅक करू, असा इसारा दिला. हे सरकार भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतं. त्यामुळे काळजी घ्या, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.

मराठ्यांचा आवाज दाबला तर…

राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असं सांगतानाच आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली. पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा त्यांनी दिला.

स्वस्थ बसणार नाही

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोलापूरच्या वेशीवर मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आलं आहे. त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं. नाही तर आम्ही जागचे हलणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कार्यकर्त्यांची धरपकड

मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी संचारबंदी लागू असल्याचं आणि कोरोनाचं कारणही देण्यात आलं होतं. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली. त्यामुळे नरेंद्र पाटीलही संतप्त झाले होते. (narendra patil slams mahavikas aghadi over Maratha Reservation )

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला; सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चा; अनेकांची धरपकड

आज सांगून मोर्चा काढला, उद्या न सांगता मोर्चा काढू, मग पाहू काय होते ते; नरेंद्र पाटलांचा इशारा

एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही; महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

(narendra patil slams mahavikas aghadi over Maratha Reservation )