अमरावती: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महिलेला बसवायचं आहे, अशी घोषणा शिवशक्ती-भीमशक्तीच्या मेळाव्यात केली. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं स्वागत होत असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. तसं झालं तर आम्हाला अभिमानच वाटेल असं नवनीत राणा म्हणाल्या. नवनीत राणा आणि ठाकरे गटात विस्तवही जात नाही. संधी मिळताच नवनीत राणा ठाकरे गटाला घेरण्याचं काम करत असतात. मात्र, आज त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला व्हावी हे शब्द उद्धव ठाकरे यांच्या मुखातून पचत नाहीत. ज्याना स्वतः मुख्यमंत्री व्हायची हौस आहे. ते दुसऱ्याला मुख्यमंत्री व्हायचे स्वप्नं कसे पाहू शकतात? उद्धव ठाकरे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात, अशी टीका करतानाच जर महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल, असं नवनीत राणा म्हणाल्या.
आम्ही महिला खूप टॅलेंटेड आहे. पहिली महिला राष्ट्रपती आमच्याच जिल्ह्यातून झालेली आहे. मला त्याचा अभिमान आहे. पण ज्यांनी घोषणा केली, त्यांच्या मुखातून हे शब्द पचत नाहीत, असं त्या म्हणाल्या. आम्ही उद्धव ठाकरेंचं विधान फार गांभीर्याने घेत नाही. पण महिला मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी राजकारण करावं. पण त्यात देवाला उतरवू नये. त्या वक्तव्यावर निषेध झालेला आहे. अडिच वर्षांत की तरुणांना नोकऱ्या दिल्या ते आधी सांगा. एमपीएससीच्या मुलांचे खूप प्रश्न आहेत. तुम्ही डॉक्टर, सिस्टर, ब्रदर्सची भर्ती केली नाही. लोकांसाठी राजकारण करा. जे घरात बसले त्यांच्यासाठी राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणी वॉरंट निघालं आहे. या वॉरंटनुसार 14 तारखेपर्यंत राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. मात्र तोपर्यंत म्हणजे 14 तारखेपर्यंत राणा दाम्पत्यांना अटक करता येणार नाहीये.