जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेते आहेत. आपला आक्रमक स्वभाव आणि कामाच्या शैलीमुळे ते सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. जळगावातही अजित पवारांवर जीव ओवळणारा असाच एक कार्यकर्ता आहे. अरविंद बंगालसिंह चितोडिया असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या अरविंद चितोडिया चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या एका उपक्रमामुळे. अजित पवारांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवारांना जनतेचे आशीर्वाद मिळून त्यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अरविंद हे चक्क 30 क्विंटल साखर लोकांना घरोघरी जाऊन वाटत आहे. (NCP activists from Jalgaon distributing 30 quintal sugar on occasion of Ajit pawar birthday)
जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी असलेला अरविंद चितोडिया हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत. अजित पवारांना नेता मानणारे अरविंद हे दरवर्षी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी समाजहिताचे उपक्रम राबवत असतात. यापूर्वी त्याने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे घेतली आहेत. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी रक्तदान किंवा आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यापेक्षा लोकांना उपयोगात येईल, असा काहीतरी वेगळा उपक्रम राबविण्याचा विचार अरविंद यांनी केला. याच विचारातून त्यांनी लोकांना 30 क्विंटल साखर स्वखर्चाने वाटण्याचा निर्णय घेतला. सध्या अरविंद आणि त्यांचे सहकारी जामनेर तालुक्यातील वाघारी-बेटावद जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये फिरून लोकांना घरोघरी साखर वाटप करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
अरविंद चितोडिया याने 30 क्विंटल साखर वाटण्याच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे. “उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. त्यांची कार्यशैली मला भावते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे अशा नेत्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून जनतेचे आशीर्वाद मिळायला हवेत. हेच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही लोकांना घरोघरी जाऊन साखर वाटत आहोत. साखरेने लोकांचे तोंड गोड व्हावे, अजित पवारांबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण व्हावी, म्हणून आम्ही साखर वाटप करत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून अजित पवारांना जनतेकडून चांगले आशीर्वाद मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे,” असे अरविंद यांने सांगितले.
अरविंद चितोडिया यांनी भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील सुमारे 35 गावांमध्ये घरोघरी साखर वाटप करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमात प्रत्येक घरी एक किलो साखरेची पिशवी वाटप केली जात आहे. गावात साखर वाटप रथ फिरतो. अरविंद आणि त्यांचे सहकारी यांचे नियोजन या मोहिमेचे सांभाळत आहेत. अरविंद यांना त्यांचे वडील बंगालसिंह चितोडिया यांनीही प्रोत्साहन दिले आहे. ते स्वतः या उपक्रमात सहभागी आहेत.
इतर बातम्या :
(NCP activists from Jalgaon distributing 30 quintal sugar on occasion of Ajit pawar birthday)