विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, अमरावती : येत्या 2024मध्ये भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन केले आहे. तिन्ही पक्षांचे नेते या सभांना संबोधित करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. येत्या 1 मे रोजी मुंबईतही वज्रमूठ सभा होत असून या सभेला पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हजेरी लावणार आहेत. मात्र, त्याआधीच शरद पवार यांनी एक बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठच सैल होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाला टेन्शन येण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना धक्कादायक विधान केलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र मिळून 2024ची निवडणूक लढणार आहे काय? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सर्वांच्याच भुवया उंचावणारं होतं. आम्ही एकत्र लढणार. आज आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छाच पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यातील काही इश्यू महत्त्वाचे असतात. त्यावर अजून चर्चा झाली नाही. त्यामुळे 2024मध्ये आघाडी एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगू? असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर पवार यांना विचारण्यात आलं असता महाविकास आघाडीत येण्याबाबत वंचित आघाडीशी आमची चर्चा झाली नाही. वंचित आघाडीसोबत चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातील मर्यादेत जागेबाबत. त्याशिवाय दुसरी कसलीही चर्चा झाली नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही पवार यांनी भाष्य केलं. त्यांच्या स्टॅटेजीनुसार ते फोडाफोडीचं काम करत असतील. आम्हाला भक्कमपणाने भूमिका घ्यावी लागेल. त्यावर आज सांगणं योग्य नाही. कारण आम्ही या संदर्भात कुणाशी चर्चा केली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.