नगर : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अंगावर घेणं भाजपचे आमदार नितेश राणे यांना चांगलंच भोवलं आहे. स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. राणे यांच्या या विधानाची संग्राम जगताप यांनी येथेच्छ खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेशी नजर भिडवता येत नाही, अशी जहरी आणि खोचक टीका संग्राम जगताप यांनी केली आहे. त्यामुळे आता नितेश राणे हे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आज नगर शहरात स्वाभिमान नसलेला एक आमदार आला होता. स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. असं त्यांनी सांगितलं. निश्चितच. उंचीचा प्रॉब्लेम असल्याने नजरेला नजर मिळत नाही. माझ्या शर्टाच्या पहिल्या गुंडी एवढीच त्या आमदारांची उंची आहे. त्यांना नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही निश्चित येऊ. नगर शहरात अशा प्रकारची भाषा वापरण्याचे काम करू नये. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशाराच संग्राम जगताप यांनी नितेश राणे यांना दिला आहे.
नितेश राणे हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार काय? माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. पुढच्यावर्षी 2024 आहे. जो कार्यक्रम आहे तो एकदाच करू. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदुंची ताकद दाखवणार, असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. त्यावर संग्राम जगताप यांनी पलटवार केला आहे.
अहमदनगरला काही दिवसांपूर्वी शहरातील कापड बाजारातील व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्या प्रकारणी नितेश राणे यांनी भेट घेतली होती. यावेळी राणेनी आक्रमक होत हल्ला करणाऱ्या आरोपींना इशारा दिला होता. तसेच ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांवर हल्ला झाला त्या ठिकाणची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भाषणामध्ये बोलताना मात्र नितेश राणे यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना शिवी दिलीय. तसेच पोलीस प्रशासन काम करत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलाय. तसेच जर हिंदुंवर हात उचलले तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.