उस्मानाबादः आगामी निवडणुकांमध्ये MIM महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) येऊ शकते, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिलाय, त्यावर भाजपने आघाडीतील तिन्ही पक्षांची चांगलीच खिल्ली उडवणं सुरु केलं आहे. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी भलतेच वक्तव्य केले आहे. नितेश राणे (Nitesh Rane) हे आज सह कुटुंब तुळजापूरमधील भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले आहेत. तेथे MIM च्या प्रस्तावावर प्रतिक्रिया त्यांची जीभ घसरली. MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे हा त्यांचा आपापसातला प्रश्न आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
भाजप नेते नितेश राणे तुळजापूरमध्ये बोलताना म्हणाले, MIM ने तिघांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यांनी खुशाल लग्न करावे, हनीमून करावे. त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, हा प्रश्न आमचा नाही. त्यांचा परस्परांमधला प्रश्न आहे. भाजप म्हणून आम्ही सरळ स्पष्ट आहोत. 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वतःच्या ताकदीवर सत्ता आणतंय एवढं सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
MIM ने महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडाही हाती घेऊ शकते, अशी टीका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाचं स्वप्न देवेंद्र फडणवीस साकार करतील, असं वक्तव्यही नितेश राणे यांनी केलं. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडी नावाचे संकट 29 नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्रावर आलंय ते संकट दूर करण्यासाठी भवानी मातेला साकडं घातलं आहे. संभाजीनगर आणि धाराशिव हे नामकरण करणे उध्दवजींच्या नशिबात नाही ते काम देवेंद्रजी करतील. बाळासाहेबांची सगळी स्वप्न भाजप यापुढे पूर्ण करेल. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस हेच हिंदुहृदयसम्राट आहेत., असं वक्तव्य नितेश राणे यांनी करत शिवसेनेला डिवचलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे. याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘ नवाब मलिकांचा राजीनामा अद्याप झालेला नाही. कारण दाऊदच्या आशीर्वादाने चालणारे सरकार आहे. जोपर्यंत दाऊद डोळा मारत नाही तोपर्यंत हे सरकार नवाबचा राजीनामा घेत नाही, अशा शब्दात महाविकास आघाडीवर खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.
इतर बातम्या-