गणेश सोळंकी, Tv9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या एकफळ या गावातील तरुणांना सध्या लग्नाची चिंता सतावत आहे. या गावातील फक्त मुलींना स्थळ चालून येत असली, तरी तरुणांना स्थळ घेऊन येणाऱ्यांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसावे लागत आहेत. गावाला रस्ताच नसल्याने लग्नासाठी मुलगी देण्याचे धाडस कुठल्याही मुलीच्या पित्याने दाखवलेले नाही. यामुळे या गावातील 40 ते 50 तरुण आजही अविवाहित आहेत.
दुसरीकडे गावातील महिला, शाळकरी मुले, चाकरमानी यांना रोज भाकरीच्या लढाईसाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून ये-जा करावे लागत असल्याने ग्रामवासी त्रस्त झालेले आहेत.
मात्र या गावकऱ्यांची हाक ऐकायला कुणीही तयार नसल्याचे दिसून येत आहे. रस्ता नसल्याने रेल्वे रुळावरून जाताना एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केवळ 500 लोकसंख्या असलेले एकफळ हे गाव शेगावपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. अंतर कमी असले तरी, येथील ग्रामस्थांना शेगावात पोहोचण्यासाठी किमान दोन तास लागतात. ग्रामस्थांना अळसणामार्गे शेगावला जावे लागते.
मात्र अळसणा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मंजूर झालेत. काही जमिनींच्या दानपत्रामुळे हे काम अडकले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रेल्वे पुलाला लागून असलेल्या बिकट रस्त्याने अळसणापर्यंत पायी जावे लागते.
सध्या पावसाळ्यात या रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचते. तो रस्ताही बंद होतो. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून जावे लागते.
येथील नागरिकांना एक किमीचा रेल्वे रुळावरील प्रवास करताना साक्षात देव आठवतो. कारण पुलावरुन जात असताना समोरुन किंवा मागून रेल्वे गाडी आली तर उंच रुळावरून उडी मारणे किंवा रेल्वे खाली येणे या शिवाय कुठलाही पर्याय त्यांच्या समोर नसतो.
या गावात रात्री बेरात्री प्रसूतीसाठी किंवा रुग्ण असले की, बैलगाडी किंवा खाटेवर टाकले जाते. शेगावला आणत असताना संपूर्ण गावकर्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यापूर्वीही रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी खांद्यावर बसवून रुग्णालयापर्यंत न्यावे लागले.
रस्त्याअभावी शिक्षणाची स्थितीही गंभीर आहे. पाऊस आला की, त्यादिवशी शाळेला दांडी मारण्याशिवाय पर्याय नसतो. कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही.
या गावात रुग्णालय नाही, शाळा आहे ती चौथीपर्यंतच. अंतर्गत रस्ते नाहीत आणि नाल्याही नाहीत. हे गाव वसल्यापासून मूलभूत सेवा सुविधांपासून वंचितच राहिली.
या गावात जाण्यासाठी आजही कोणताच रस्ता नाही. यामुळे येथील लोकांना ये-जा करण्यासाठी रोज आपल्या जीवाची बाजी लावावी लागते.
आतापर्यंत या गावातील अनेक गावकरी या पुलांचे बळी ठरले आहेत. पण आजतगायत गावासाठी कोणतीही सोय प्रशासनातर्फे करण्यात आली नाही. सर्वात महत्वाची समस्या म्हणजे लग्नासाठी मुलगी देण्याचे कुणी धाडस करत नाही. त्यामुळे गावाला पाहिजे फक्त रस्ता अन् रस्ता..