उस्मानाबाद : उपोषणाचा सहावा दिवस आहे. काही ठिकाणी एसटीची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या आंदोलनाबाबत खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, मागच्या सहा दिवसांपासून सनदशीर, लोकशाही मार्गानं आंदोलन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी म्हणून हे आंदोलन करत आहोत. काही समाजविघातक लोकं आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. विमा कंपनीच्या विरोधातील हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हावेत, यासाठी हे आंदोलन आहे.
शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं पाहिजे. जलसमाधी घेऊन, स्वतःला खड्ड्यात पुरून हे आंदोलन करण्यात आलं. कुणाला त्रास होणार नाही, या पद्धतीची आंदोलनं केली आहेत. शासकीय मालमत्तेचं नुकसान करणं म्हणजे आपलचं नुकसान करणं आहे. यात काही बहादूरकी नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हिंसक आंदोलन आम्हाला मान्य नाही. हे आम्हाला मान्य नाही. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्हाला मान्य नाही, असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले.
आंदोलन सुरू केल्यापासून मोजक्या लोकांची नावं लावण्यात आली. पण, 2020 चा विमा भरणाऱ्या लोकांच्या याद्या प्रशासनानं लावल्या. प्रशासन कामाला लागलं ही सकारात्मक बाब आहे.पण,विमा कंपनी विम्याचे पैसे द्यायला नकार देत असेल, तर कंपनीची प्रापर्टी जप्त करून तिचा लीलाव करून ते पैसे जमा करण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं पाऊल उचललं आहे.
कंपनीच्या बाबतीत प्रशासन कामाला लागलं आहे. 248 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडं गेलेला आहे. सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावेत, ही कैलास पाटील यांची भूमिका आहे. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावेत. शासनानं या आंदोलनाची तातडीनं दखल घ्यावी.