मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर : विजयादशमीला (Vijayadashami) देशभरात रावणाचं (Raavan) दहन करुन सोनं वाटलं जातं. दसरा साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात (Maharashtra) एका ठिकाणी चक्क रावणाची पूजा करण्यात आलीय. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात रावणाची पूजा करण्यात आली. रावणाचं दहन करण्याऐवजी त्याची पूजा का केली पाहिजे, याची कारणंही पूजा करणाऱ्यांनी सांगितलं.
दसऱ्याच्या दिवशी पालघरच्या शिवाजी चौक इथं रावणाची पूजा करण्यात आली. चौकात रावणाचा प्रतिकात्मक फोटो लावून त्याची आरती ओवाळण्यात आली. आदिवासी एकता परिषदेच्या वतीने रावणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. चक्क रावणाची पूजा करण्यात आल्यानं अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलंय.
पालघरमध्ये आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेना यांच्यावतीने रावणाची पूजा केली गेली. रावण हे श्रद्धेचं प्रतीक असल्याचा दावा या दोन्ही संघटनांच्या वतीने करण्यात आला. रावणाचं दहन केल्यानं आपण आपल्या बुद्धिमत्तेचंही दहन करतो, असंही मत यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताराम करबट यांनी रावणाची पुजा का केली पाहिजे, यावर सविस्तर आपली भूमिका मांडली. रावणानं सीतेचं अपहरण केलं. पण तिचा स्त्री सन्मान राखला. सीतेला कोणत्याही प्रकारजी इजा त्याने होऊ दिलेली नाही. लंकेचा राजा असलेल्या रावणाने आपल्या तपश्चर्येनं भगवान शंकरालही प्रसन्न केलं होतं, असंही करबट यांनी म्हटलंय.
शंकराला प्रसन्न करणाऱ्या रावणारा, स्त्री सन्मान राखणाऱ्या रावणाला, प्रचंड बुद्धिमत्ता असणाऱ्या रावणाला मानलं पाहिजं, असं करबट यांनी यावेळी म्हटलंय. रावणाला दहा तोंड दाखवून, त्याचं आक्राळविक्राळ रुप दाखवून त्याचं प्रतिकात्मक दहन केल्यानं आपण एकप्रकारे आपल्या बुद्धीचं दहन करतो, असंही मत करबट यांनी व्यक्त करत रावणाची पूजा करण्याच्या भूमिकेचं समर्थनदेखील केलं.