धाराशिवमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील इतर मतदारसंघापेक्षा या मतदारसंघातील निकालाने सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आणि फेऱ्यांमध्ये निंबाळकरांचे एकहाती मिशन सुरु आहे. ज्या तालुक्यांमधून प्रतिस्पर्धी अर्चना पाटील यांना मोठी लीड मिळण्याची उमेद होती, तिथे फसगत झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची घौडदौड थांबवलीच नाही तर मतदानात एक लाखांचा टप्पा पण ओलांडला आहे.
धाराशिवमध्ये निंबाळकरांची टशन
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघानंतर सर्वांचे लक्ष धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी महायुतीने जबरी प्रयत्न केले होते. सभा, प्रचार रॅली यांच्या माध्यमातून महायुतीने कुठलीही कसर सोडली नव्हती. तर खासदार मीच होणार आणि दिल्लीला जाणार असा विश्वास निंबाळकरांनी प्रचारादरम्यान अनेकदा व्यक्त केला होता. या ठिकाणी सुरुवातीच्या निकालावरुन तरी निंबाळकरांनी मोठा पल्ला गाठल्याचे समोर येत आहे.
ओलांडला 1 लाख मतांचा टप्पा
शिवसेनेचे उबाठा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख मतांचा टप्पा पार केला. चौथ्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांना 1 लाख 3 हजार मते मिळाली. दोन्ही उमेदवार यांच्यात 44 हजार मतांचा मोठा फरक पडला आहे. राष्ट्रवादी उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा फटका, ओमराजे यांची वन वे आघाडी मिळाली आहे. ओमराजे यांची विजयाकडे वाटचाल, विक्रमी मतांनी विजयी होण्याची चिन्हे आहेत.2019 ला ओमराजे 1 लाख 27 हजार मतांनी निवडून आले होते.
मताचा टक्का पथ्यावर
धाराशिव मतदार संघ खेचून आणण्यासाठी महायुतीकडून अर्चना पाटील यांना मैदानात उतरविण्यात आले होते. तर उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांना तिकीट दिले होते. यावेळी या मतदारसंघात जोरदार मतदान झाले. 6 विधानसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी 63.88 टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभेपेक्षा मतांचा टक्का वाढला. हा मतांचा टक्का निंबाळकरांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आता रंगली आहे.