वसई | 20 जुलै 2023 : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. मुंबई-अहमदाबाद महामार्गाची वाहतूक बंद पडली. वसई, विरार, नालासोपारा शहरांमध्ये पाणीच पाणी झालं. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे नागरीकही भयभीत झाले. विशेष म्हणजे समुद्राला भरती आलेली होती. त्यामुळे समुद्राचं पाणी शहरात शिरलं होतं. जिथे बघावं तिकडे पाणी, याशिवाय आकाशातून पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली. वसई-विरार महापालिकेने अनेक ठिकाणी रेस्क्यू करुन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. या दरम्यान संकट काळातही काही महिलांनी विरंगुळा म्हणून गरबा खेळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
वसईत साचलेल्या पाण्यात महिलांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला आहे. वसई पश्चिम साईनगरमधील गुरुवारी संध्याकाळी 5 वाजताची ही दृश्य आहेत. तीन दिवसांपासून वसईत मुसळधार पाऊस सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे दिवसभर वसई, विरार, नालासोपारा जलमय झालं आहे.
वसईत साचलेल्या पाण्यात महिलांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला #vasaivirar #rain pic.twitter.com/FaLP5YMyW4
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2023
विशेष म्हणजे दुपारनंतर पाऊस बंद झाला पण सायंकाळपर्यंत साचलेलं पाणी ओसारलं नाही. शेवटी घरात कंटाळलेल्या महिलांनी साचलेल्या पाण्यात गरबा खेळून आपला आनंद व्यक्त केला. वसईतील महिलांच्या पावसातील गरबा खेळून आनंद व्यक्त करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
पालघरमध्ये दुपारपासून पावसाने उसंत घेतली असली तरी हवामान विभागाकडून पुढच्या 24 तासांसाठी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. पाऊस पुन्हा मुसळधारपणे कोसळला तर कदाचित पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत सध्या संध्याकाळपासून पाऊस बंद आहे. पण तरीही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यभरात पावसाचे संकेत वर्तवण्यात आले आहेत. पुढचे काही दिवस हे पावसाचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.