वसई : आता पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटक धबधब्यावर पिकनिकला जात आहेत. वसईतील पाच मित्र कॉलेज चुकवून तुंगारेश्वरला फिरायला गेले होते. यावेळी एक तरुण धबधब्यावर पोहायला उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. राकेश सुरेला असे मयत 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
राकेशा सुरला वसई पश्चिमेच्या आनंद नगर येथील जय वृंदावन येथे राहत होता. राकेश बारावीचा विद्यार्थी होता. कॉलेजला दांडी मारुन सोमवारी दुपारी राकेश मित्रांसोबत तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेला होता. यावेळी त्याला धबधब्यावर पोहण्याचा मोह झाला. राकेश धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने राकेश बुडाला.
सध्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरातील समुद्र किनारे, धबधब्यावर 15 जुलैपर्यंत जाण्यास मनाई आदेश आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे असे आदेश असताना स्थानिक पोलिसांमार्फत कोणताही पोलीस बंदोबस्त तेथे ठेवण्यात आला नाही. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मावळातील इंद्रायणी नदीच्या डोहात इंदोरी पुलाजवळ एक मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना घडली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात मावळ वन्यजीव रक्षक शोध पथकांना यश आले आहे. प्रज्ञा कौशल भोसले असे या तरुणीचे नाव आहे. मावळ वन्यजीव रक्षक टीम आणि आपदा मित्र मावळ यांच्या रेस्कू टीमने, तसेच आंबी एमआयडीसी पोलीस पथकाने मुलीचा मृतदेह बाहेर काढला. मात्र ही मुलगी पाण्यात कशी पडली याचा शोध पोलीस घेत आहेत.