बीड: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. पण त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं सांगितलं. तसेच फडणवीस यांच्यासोबतच्या कार्यक्रमात का नसते याचं कारणही सांगितलं. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी आणखी एक विधान केलं आहे. कोई मुझे पसंद करे या ना करे. या जगात मी कुणालाच घाबरत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा निशाणा नेमका कुणावर आहे? अशी चर्चा आता रंगली आहे.
अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांनी या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरेही दिली. यावेळी झालेल्या भाषणात पंकजा मुंडे नेमक्या कोणाला घाबरतात याचं रहस्य त्यांनी उलगडले आहे.
मी या जगात कोणालाही घाबरत नाही. पण माझा मुलगा आर्यमान याला खूप घाबरते कारण आजच्या पिढीची बुद्धी फार तीक्ष्ण आहे. त्यामुळे वाद घालण्यात अर्थच नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी समाजात घडणाऱ्या काही अप्रिय घटनेवर पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यात प्रामुख्याने ड्रग्स पासून दूर राहा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. ड्रग्स आतंक वादापेक्षाही घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याबरोबरच कोई मुझे पसंद करे या ना करे… असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांचा हा टोला भाजपला असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यांनी परळीतून टीव्हीवर केंद्रीय अर्थसंकल्प पाहिला. त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागतही केलं.
त्यानंतर दिवसभरातील आपले दौरे आटपून झाल्यानंतर पंकजांनी परळीतील जिजामाता उद्यानासमोरील शिव भाजी सेंटरला भेट दिली. तसेच आपल्या कार्यकर्त्यांसह पावभाजीवर ताव मारला.