Parbhani Band : परभणीत आंबेडकर अनुयायांचा संताप; जिल्हा बंद, प्रशासन अलर्ट मोडवर

| Updated on: Dec 11, 2024 | 11:37 AM

Parbhani Band : परभणी शहरासह जिल्ह्यात बंदचे वातावरण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील घटनेची, संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर अनुयायी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

Parbhani Band : परभणीत आंबेडकर अनुयायांचा संताप; जिल्हा बंद, प्रशासन अलर्ट मोडवर
परभणी बंद
Follow us on

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तिथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे. मंगळवारी एका माथेफिरूने सायंकाळी साडेपाच वाजता या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले. त्यांनी काल संध्याकाळीच रेल्वे रोको आणि रस्ता रोको केला. तर आज आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

परभणीत कडकडीत बंद

काल हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. तर परभणी रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेससमोर नारे दिले आणि गाडी रोखून धरली. दरम्यान आज परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक भागात बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, दुकाने, शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट दिसला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा चोख बंदोबस्त

परभणी बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरसीपीच्या तीन तुकड्या परभणी शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परभणी बाजारपेठ सकाळपासून कळकळीत बंद पाळण्यात आला आहे. अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमायला सुरुवात केली आहे.

खानापूर फाटा परिसरात आंबेडकर अनुयायांकडून रस्त्यावर टायर जाळत रस्ता अडवण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी -नांदेड वाहतूक पूर्णपणे बंद आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. आरोपीची नार्को टेस्ट करत घटनेच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केली आहे आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसे नाही झाले तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.