परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ महादेव जानकर यांना मतांची लीड काही साधता आली नाही. परभणीत त्यांच्या शिट्टीचा आवाज काही घुमला नाही. महायुतीने ऐनवेळी केलेली ही कसरत किती फायद्याची ठरली हे अवघ्या दोन ते तीन स्पष्ट होईलच. पण सध्या महादेव जानकर हे अडचणीत असल्याचे मतांची आकडेवारी बोलते. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये त्यांना एकदाही आघाडी घेता आली नाही. तर धाराशिवनंतर उद्धव ठाकरे यांचा परभणीचा शिलेदार पण दिल्लीकडे कुच करणार अशी चर्चा रंगली आहे. संजय जाधव यांनी या मतदारसंघात मोठी मुसंडी मारली आहे.
मतांची वन वे आघाडी
परभणी लोकसभा मतदारसंघात 34 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होती. परभणी मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी सोडण्यात आला होता. ऐनवेळी येथून महादेव जानकर यांचे नाव पुढे आले. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात तुल्यबळ लढत होईल हे पक्के होते. पण या निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीने वेगळेच चित्र मांडले. गेल्या तीन तासांत संजय जाधव यांची आघाडी कायम आहे. त्यांनी वन वे आघाडी घेतल्याचे दिसते. जानकर यांना या काळात एकदाही लीड घेता आलेली नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठतील अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात मतमोजणी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
संजय जाधव यांची मोठी लीड
संजय हरिभाऊ जाधव यांनी परभणीत मोठी आघाडी घेतली आहे. मत मोजणीचे एकामागून एक टप्पे होत आहे आणि त्यामध्ये बंडू जाधव यांनी अद्याप आघाडी सोडलेली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या शिलेदाराला 1,13,593 मते पडली आहेत. तर महादेव जानकर हे एक लाखांच्या जवळपास मते मिळाली आहेत. त्यांना 95,220 मते मिळाली आहे. 18,373 मतांनी संजजय जाधव यांनी आघाडी घेतली आहे. तर वंचितकडून नशिब आजमावत असलेले पंजाबराव डख यांना 22,623 मत सुरुवातीच्या टप्प्यात पडलेली आहेत.
संजय जाधव साधणार हॅट्रिक?
मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघ महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती. महायुतीने त्यांच्यासाठी रान पिंजून काढले. स्वतः पंतप्रधानांनी आपण त्यांच्या पाठीशी असल्याचा जाहीर संदेश दिला. पण सध्याचे मतांचे चित्र पाहता संजय जाधव हे हॅटट्रिक साधणार का याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.