परभणी : शिवसेना उपनेता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात तुलना करण्यात आली आहे. राखी सावंत गायिका, अमृता फडणवीसही गायिका आहेत. तसेच राखी सावंत मॉडेल आहेत, तसं अमृता फडणवीसही मॉडेल आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत पोहोचली. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. त्यांच्या या तुलनेवरुन आका भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची राखी सावंत यांच्यासोबत तुलना केली होती. सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंतची थेट अमृता फडणवीस यांच्यासोबत तुलना केली. विशेष म्हणजे मोहित कंबोज यांनी राजकारण राखी सावंत हिचं नाव घेतल्याने तिने स्वत: मोहित कंबोज यांच्यावर टीका केलेली. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी राखी सावंतचा उल्लेख आपल्या भाषणात केला आहे.
“राखी सावंत या बिचारी माऊलीची तिच्या क्षेत्रानुसार तुलनाच होऊ शकेल तर ती फार फार तर आमच्या अमृता वैनींसोबत होईल. असं काय करता दादा? बघा, आमच्या राखी ताईंच्या चेहऱ्याची सर्जरी झालीय, आमच्या अमृता वैनींचीसुद्धा चेहऱ्याची सर्जरी झालीय. आमची राखी ताई सिंगर आहे. आमच्या अमृता वैनी सिंगर आहेत. आमची राखी ताई मॉडेल आहे. आमच्या अमृता वैनींपण मॉडेल आहेत. जर तुमचा उद्देश चांगला असेल तर तुम्हाला हे सत्य मान्य करावं लागेल”, असं सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या.
सुषमा अंधारे यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर आपल्या भाषणात भूमिका मांडली. “वज्रमूठ सभेनंतर संभाजीनगर येथे गोमूत्र शिंपडले. तुम्ही मुस्लिम, बुद्ध, इतर 18 पगड जातीचा समाजाचा अपमान करताय. या अपमानाचा बदला घ्यायचा. आमच्या स्पर्शाचा विटाळ होतो. गोमूत्र शिंपडणारी ही नवनीत राणा प्रवृत्ती आहे ते तुम्हाला माणूस नव्हे तर जनावर समजतात”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.
“जे लोक सोनिया गांधी यांना बदनाम करतात ते सहज सुषमा अंधारेची तुलना राखी सावंत यांच्याशी करतात. निर्लज्ज पानाचा कळस आहे. महिलंचा फोटो मोर्फ करतात. त्यावर पोलीस कारवाई करीत नाहीत. राहुल गांधी यांनाही बदनाम केले गेले. राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू म्हणून टिंगल केली. भारत जोडो यात्रावर टीका केली, उपहास केला. जसा राहुल गांधीना पपू केले तसेच महाराष्ट्रात गांधी यांना बदनाम केले. हिंमत असेल तर मुद्दे मांडा, उत्तर द्या. आदित्य ठाकरे यांना सुरुवातीला बच्चा म्हणून दुर्लक्ष केले. मग पेंग्विन म्हणाले. नंतर बापही मुख्यमंत्री आणमि मुलगाही मंत्री असे केले”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.