कोल्हापूर | 8 February 2024 : शिवसेना ही नवीन नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, असे उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची कळी खुलली आहे. आता लोकसभेसाठी अनेक जण उमेदवारीचा दावा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर फिरत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला युवकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे गेल्यावर मन मोकळे केले.
तरुणांना मिळेल संधी
शिवसेना ही नवीन नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीत भविष्य आजमावू पाहत असलेल्या तरुणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आता हा पक्ष कोणत्या उमेदवारांची फळी उभी करतो, हे लवकरच समोर येईल.
कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला
कोल्हापूर येथील शिवसेना आणि शिवसैनिकात नवचैतन्य आले आहे. कोल्हापूर हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मागे भक्कमपणे उभी ठाकेल, असा विश्वास पण त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मतपेटीतून नाराजी दिसेल
शिवसेनेबाबत जो निर्णय झाला. तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसबाबत झाला. लोकशाही धोक्यात आली आहे. आमचं चिन्ह काढून घेण्यात आलं, तेव्हा 2004 पासून घटना सबमिट करण्यात आलेल नाही असे कारण सांगण्यात आले. मात्र आता शरद पवार हयात असताना ते स्वतः स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह काढून घेतले जाते.ही उघडपणे लोकशाहीची हत्या सुरू आहे. जनतेला गृहित धरु नका, जनता सूज्ञ असल्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि नवीन चिन्ह जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पण त्यांनी व्यक्त केला.