अहमदनगर / मनोज गाडेकर : संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे गावच्या हद्दीत पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर त्याठिकाणाहून पायी जाणारी तीन शाळकरी मुले जखमी झाली आहेत. संतोष नारायण शिंदे असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. अपघातात जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पिकअप चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
जुन्नर येथील संतोष नारायण शिंदे हे ट्रॅक्टर सर्व्हिसिंगसाठी आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. गुरूवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाला जोराची धडक दिली. यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन ट्रॅक्टरचालक संतोष नारायण शिंदे हे जागीच ठार झाले.
याच दरम्यान त्या ठिकाणाहून जाणार्या तीन शाळकरी मुलांनाही धडक बसली. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेतून जखमी शाळकरी मुलांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. संतोष शिंदे यांचा मृतदेह कुटीर रुग्णालयात आणण्यात आला.
डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टोलनाक्याचे कर्मचारीही क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रॅक्टर महामार्गावरून बाजूला घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.