गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 03, 2021 | 2:30 PM

Gopichand Padalkar | गेल्या तीन दिवसांपासून दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि त्याचा साथीदार निलेश क्षीरसागर हे फरार होते. त्यांना लवकर पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
गोपीचंद पडळकर, आमदार
Follow us on

सोलापूर: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या दोन तरुणांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) गुरुवारी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी श्रीशैल नगर येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ओळख पटवून आरोपी तरुणांचा शोध सुरु केला होता. (Police arrested youth for attacking on MLA Gopichand Padalkar car in Solapur)

गेल्या तीन दिवसांपासून दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि त्याचा साथीदार निलेश क्षीरसागर हे फरार होते. त्यांना लवकर पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा येथुन शनिवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे. अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याबाबत त्याच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत. तसेच त्याने दगडफेकी सारखे पाऊल कुणाच्या सांगण्यावरून उचलले आहे का, याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.

पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारी व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होती, हे कशावरुन? काही लोक स्वत:हून गाडीवर दगडफेक करुन घेतात, अशी शंका अजित पवार यांनी बोलून दाखविली होती.


दगडफेकीच्या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केली होती. सोलापुरात दुपारी 4 नंतर संचारबंदी होती. नियमांची पूर्ण काळजी घेत आम्ही घोंगडी बैठक आयोजित केली होती. मात्र ही बैठकही झाली नाही. पोलिसही तिथे उपस्थित होते. असं असूनही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर करा. पण पुण्यात पक्षाच्या कार्यालयाचं उद्धाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे पडळकर यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

चुकीला माफी नाही, पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आधी गाडीवर हल्ला, आता गोपीचंद पडळकरांवर गुन्हा, पडळकर म्हणतात, अजित पवारांना का सोडलं?

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

(Police arrested youth for attacking on MLA Gopichand Padalkar car in Solapur)