50 खोके, 105 डोके… नांदेडमधील बॅनर्सने खळबळ, बॅनर्स कुणी लावले?; भाजप की…?

| Updated on: Jun 17, 2023 | 10:13 AM

उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीतील बॅनरचं लोण आता नांदेडपर्यंत पोहोचलं आहे. या बॅनरमधून शिंदे गटाला डिवचण्यात आलं आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे बॅनर कुणी लावले ते मात्र गुलदस्त्यात आहे.

50 खोके, 105 डोके... नांदेडमधील बॅनर्सने खळबळ, बॅनर्स कुणी लावले?; भाजप की...?
poster war
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात चांगलंच पोस्टरवार रंगला आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांना बॅनर्समधून सुनावलं जात आहे. आमचाच नेता कसा ग्रेट आहे हेही सांगितलं जात आहे. या पोस्टरवार नंतर दोन्ही पक्षातील बड्या आणि जबाबदार नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपने तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. तर शिंदे गटाने भाजपच्या नेत्याची औकात काढली आहे. दोन्ही पक्षातील हे युद्ध सुरू असतानाच आता नांदेडमध्येही बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्समधून शिंदे गटाला डिवचण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

नांदेडच्या मध्यवर्ती भागातच चौकात हे बॅनर्स लागले होते. या भल्या मोठ्या बॅनर्सवरील मजकूर शिंदे गटाला डिवचणारा होता. त्यातून भाजपलाही चिमटे काढण्यात आले होते. 50 खोके, 105 डोके… देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच… माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस समर्थक, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. या बॅनरवर चाणक्याचा फोटो होता. तसेच असंख्य खोक्यांचाही फोटो होता. त्यामुळे या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली होती. हे बॅनर कुणी लावले अशी चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

भाजपने जर बॅनर लावले असतील तर ते त्यावर खोक्यांचा फोटो का छापतील? 50 खोके, 105 डोके… असं म्हणून विरोधकांच्या आरोपांना बळ का देतील? असा सवालही या निमित्ताने केला जात होतो. कुणी तरी अज्ञात व्यकीने किंवा विरोधकांकडून कुणी तरी हे बॅनर लावल्याची चर्चा होती. दरम्यान, हे बॅनर लागल्यानंतर पोलिसांनी आणि पालिकेने त्याची गंभीर दखल घेतली. हे बॅनर लागलीच हटवण्यात आलं आहे.

ते खरं आहे, पण बॅनर हा खोडसाळपणा

नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचनारे बॅनर अज्ञातांनी लावल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. यावर शिंदे गटांकडून प्रतिक्रिया देण्यास कुणीही उपलब्ध होऊ शकलं नाही. मात्र भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे खरे असल्याचे स्पष्ट केलंय. मात्र लावलेले बॅनर हे भांडण लावणारं आणि खोडसाळपणा असल्याची प्रतिक्रिया चिखलीकर यांनी व्यक केली आहे.

आतमध्ये खूप काही चाललंय

दरम्यान, या बॅनरवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचं आतमध्ये खूप काही चाललं आहे, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. हे सरकार लवकरच पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावे. महायुतीत सर्व काही आलबेल नाहीये, असं नाना पटोले म्हणाले.