गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्याच्या साम्राज्यामुळे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना (Collector Sanjay Meena) यांनी आलापल्ली ते सिरोंचा 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहतूकीस बंदी घालण्याचा निर्णय देखील घेतला आहे. महामार्गावरील (Highway) खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये देखील वाढ झालीयं. जड वाहतूकीमुळे रस्ता दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे. पावसामुळे तर रस्त्याचे तीनतेराच वाजले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील सतत 10 ते 12 दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस होता. या पावसाच्या फटक्यामुळे नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसह 6 राज्य महामार्ग आणि अनेक दुर्गम भागातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास प्रवाशांना लागत असून जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील प्रवाश्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
प्रवास करताना जीवाला धोका व अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे महामार्गावर आहेत. तसेच खड्ड्यांमुळे 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच तासांपेक्षाही अधिक वेळ लागतोयं. यामुळे वाहनांच्या रांगाच रस्त्यावर लागत आहे. इतकेच नाही तर जड वाहनांमुळे अधिक वेळ प्रवाश्यांचा जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनास या रस्त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजून रस्त्याची दुरूस्थी करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करताना दिसत आहेत.
या राष्ट्रीय महामार्गावर मागील तीन वर्षात 60 लोकांच्या जीव गेल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आलीयं. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निष्काळजीपणामुळे कोर्टात जनहित याचिका संतोष काटे यांनी दाखल केलीयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही अद्याप या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी या राष्ट्रीय महामार्गाचे काम ताबडतोब करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलीयं. अजूनही महामार्गाचे काम सुरू करण्यात न आल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय.