हिंगोली: काँग्रसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल कळमनुरी येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. सुदैवाने मोठा जमाव असल्याने हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आली. मात्र, या हल्ल्यानंतर सातव यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी प्रतिक्रिया देताना एक भीती व्यक्त केली आहे. मी महिला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला घाबरवून घरी बसवण्याचा प्रयत्न होता. पण मी अजिबात घाबरणार नाही, असं सांगतानाच माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रज्ञा सातव यांनी सांगितलं.
प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा घटनाक्रमच सांगितला. त्या काल कळमनुरीतील कसबे धावंडा गावात गेल्या होत्या. त्यावेळी रात्री 8.30 वाजता हा हल्ला झाला. मी या गावात जाण्यापूर्वी एक व्यक्ती आला. मॅडम कोण आहे? असा सवाल या व्यक्तीने केला. त्यावेळी माझ्या बॉडीगार्डने त्याला बाजूला हटवलं. त्यानंतर गाडीचा दरवाजा लावून मी गावात पुढे निघाले. कसबे धवंडा गावात आले. त्यावेळी दीडशे दोनशे लोक उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी खाली उतरले, असं प्रज्ञा सावत म्हणाल्या.
गावकऱ्यांशी संवाद साधत असतानाच हा व्यक्ती माझा पाठलाग करत तिथे आला. त्याने पाठीमागून मला ओढलं आणि माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे बॉडीगार्ड आणि गावकरी धावून आले. त्यांनी या व्यक्तीला पकडले. नंतर मी लगेच गाडीत बसले आणि पोलिसांकडे आले.
पोलिसात तक्रार दिली. बाळापूर पोलिसांनी त्याला अटक केली. बाळापूर आणि कसबे धवंडा गावाचं अंतर 10 किलोमीटरचं आहे. पण पोलिसांनी त्याला पकडण्यात उशीर केला, असा आरोप प्रज्ञा सातव यांनी केला.
मी अवैध धंद्यांवर आवाज उठवला. पण अवैध धंदे बंद झाले नाहीत. माझा संशय कोणावर नाही. मात्र अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महिला प्रतिनिधी म्हणून घाबरून मला घरी बसवण्याचा प्रयत्न होत आहे , त्याला मी अजिबात घाबरणार नाही. राजीव सातव आणि राहुल गांधी यांचे विचार गावोगावी पोहोचविणारच, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. महिंद्र असं या हल्लेखोराचं नाव आहे. या हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कसबे धवंडा, येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे.
माझी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, तातडीची बाब म्हणून प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी. या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.