गोंदिया: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. ही युती झाली तेव्हा आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर हे आघाडीचा भाग असतील. त्याबाबत आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. आंबेडकर-ठाकरे युतीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वागतही केलं. मात्र, आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असून आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्तावही आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडत कहाणी आहे, असं नाना पटोले म्हणाले. प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही काही त्यांना प्रस्ताव दिला नाही, असंही त्यांनी सांगितलं. गोंदियात एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आले असता ते बोलत होते.
शिवसेना आणि आंबेडकर एकत्र आले त्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्याकडे प्रस्ताव नसल्यानं आम्हाला प्रतिक्रिया देण्याच काही काम नाही. प्रकाश आंबेडकराना आम्ही प्रस्ताव दिला नाही. त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मातोश्री निवासस्थानी बैठक झाली. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातच ही बैठक झाली. या बैठकीतून काँग्रेसला डावलण्यात आलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या 2 तारखेला पोटनिवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यात कोण कोणती जागा लढवणार हे स्पष्ट होईल, असं पटोले यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने महागाई वाढून सर्वांचा जगणं मुश्किल केलंय. शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. शेतकऱ्यांची गळचेपी केली जात आहे. मूळ मुद्याला हटवून काम करत असेल आम्हाला काही घेणं देणं नाही, असं ते म्हणाले.
पहाटेच्या सरकारचा आमचा काही संबंध नाही. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. यांना सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले गेलं नव्हतं, असं पत्र राज्यपालांच्या कार्यालयातून आलेल आहे. हे सरकार असंवैधानिक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.