चंद्रपूर : जिल्ह्यातील दिंडोरा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फास ठरलाय. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील बाधित गावकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढला. हा बैलगाडी मोर्चा रात्रभर वर्धा नदी किनारी मुक्कामी ठेवण्याचा निर्धार आहे. भजने, गाणी म्हणत मानवी साखळी करून तीव्र लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. जमिनीला नव्या कायद्याप्रमाणे भाव मिळावा, गावांचे योग्य पुनर्वसन व्हावे , जनावरासह, मासेमार व शेतमजूर यांना योग्य मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी आहे. ह्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आंदोलनस्थळी जाताना भजन म्हटली जात होती. बैलबंडीवर महिला, मुलं तसेच ज्येष्ठ बसले होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मुंबईत अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
हा प्रकल्प भद्रावती येथे १९९३ मध्ये होवू घातलेल्या निप्पोन डेनरो उद्योगाला पाणी मिळावे यासाठी होणार होता. मात्र निप्पोन डेनरो प्रकल्प रद्द झाल्यावर २०१७ ला हा प्रकल्प सिंचन प्रकल्प म्हणून जाहीर झाला. आज या प्रकल्पाची किंमत चौदाशे कोटी झाली आहे. सरकारने यात तातडीने लक्ष घालावे व ३२ गावाच्या लोकांना न्याय द्यावा यासाठी टोकाचे पाऊल उचलले गेले आहे. आंदोलनाचे प्रमुख पुंडलीक तिजारे म्हणाले, १९९९ ला जमीन अधिग्रहित करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १८ हजार रुपये एकर प्रमाणे भाव दिला.
२०१७ मध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला. २०१३-१४ च्या कायद्यानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा. काल एक मार्च रोजी बैल बंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आला. मानवी साखळी तयार करण्यात आली. प्रकल्पग्रस्त ३२ गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बैलबंडी, ट्रॅक्टर, म्हतारे, वृद्ध यांचा सहभाग आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.