बुलढाणा: मुस्लिमांना सातत्याने टार्गेट केलं जात असल्याच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपला सुनावलं आहे. या देशातील शंभर टक्के मुसलमान तुम्हाला हिंदू धर्माचे विरोधक आणि शत्रू वाटतात. या देशाचं संविधान पाहिजे तशी बदलण्याचे अधिकार तुमच्या हातात आहे. मग एक कायदा करा. भारतातील मुस्लिमांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार न देण्याचा कायदा करा. एकदा मुस्लिमांचे सर्वच्या सर्व अधिकार काढून घेतले तर फक्त हिंदू उरतात. नंतर होऊन जाऊद्या निवडणुका. मग बघू तुम्हाला कसं काय बहुमत मिळतं ते? असा हल्ला पुरुषोत्तम खेडेकर यांनी चढवला.
सिंदखेड राजा येथे सभेला संबोधित करताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांचं सरकार यायचं स्वप्न आहे. ते एक गाव एक स्मशानभूमीमुळे पूर्ण होईल, असं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.
आज ज्यांना पुरस्कार देण्यात आले. ते भारतरत्नच्या दर्जाचे आहेत. मात्र, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे केंद्रात सरकार आल्याशिवाय ते करता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सुधीर मुनगंटीवार यांनी जिजाऊ सृष्टीसाठी केंद्रातील मंत्र्यांना घेऊन एक बैठक घेऊ अशी माहिती दिली. कोणीतरी येईल आणि तुमचं कल्याण करेल हे डोक्यातील काढून टाका. मोर्च्यामुळे फायदे की नुकसान ही एक संशोधनाची बाब. हनुमानाने सूर्य हातात घेतला की माहीत नाही. त्या वादात पडायचं नाही. ,मात्र आता आपल्या मुलाने जगाची सफर केली पाहिजे असा विचार करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
आपले तिकडचे ( भाजप ) बहुजन बदमाश आणि बिनडोक आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच आहेत, असा दावाही त्यांनी करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना समर्थनच दिले.